शनिवार, १४ डिसेंबर, २०१९

दुःख माझे वाटे खोटे

ढेकर तृप्तीचा येता,
मनी समाधान वाटे.
कैक उपाशी झोपती,
दुःख माझे वाटे खोटे.

पायी पादत्राण माझ्या,
चालणे सहज वाटे.
कैक अनवाणी जन्म,
दुःख माझे वाटे खोटे.

पहुडता दिसाकाठी,
ऊब गादीची ही भेटे.
कैक कातळी झोपती,
दुःख माझे वाटे खोटे.

हृदयाची धडधड,
श्वास क्षणोक्षणी भेटे.
कैक जीव मावळती,
दुःख माझे वाटे खोटे.

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

भरकटलेला वाटसरू

तिळतिळ तुटणारे,
मन ढाळीयते अश्रू.
दुःख काटेरी बोचते,
काय काय सावरू.

नशिबाचा वेढा फिरे,
ग्रह लागतात फिरू.
फाटक्यात पडे पाय,
मन लागते बावरू.

काय खरे, काय खोटे,
शोधणे महाकठीण.
चिंता करून बुद्धीला,
येऊ लागतो शीण.

गळा टोचतो आवंढा,
डोळे लागती पाझरू.
नियतीच्या खेळामध्ये,
भरकटे वाटसरू.

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

नदी की नांदी?

जेव्हा तुंबलेली नदी,
हळूच स्फुंदून रडे.
सांगे मज मनोगत,
म्हणे मांडले हे मढे.

सांडपाण्याचा विसर्ग,
माझ्या उदरात जाई.
तिथूनच रोगराई,
जगामध्ये जन्म घेई.

निर्माल्य तुम्हा फेकण्या,
मोठी मौज सदा वाटे.
पाणी पुराचे वाढता,
डोळा पाणी कोणा दाटे?

हा अंत नाही माझा,
आत्मघात तुझा आहे.
घोडचूका तू करता,
विनाशाची नांदी आहे.

बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

आभार देवा मानतो

तहानलेल्या ह्या जीवाला,
घोट पाण्याचा भेटतो.
मनोमन मग जीव,
आभार देवा मानतो.

धावाधाव करताना,
मृत्यू चकवा हा देतो.
पुनर्जन्मच हा जणू,
आभार देवा मानतो.

उसळता आगडोंब,
भुके जीवही थकतो.
मुखी घास हा मिळता,
आभार देवा मानतो.

मीच देवाजीचे दान,
श्वास तव कृपे घेतो.
लवत्या पापणी सवे,
आभार देवा मानतो.

मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

कोसळणारा वाडा

एक वाडा चिरेबंदी,
माझा गावाकडे होता.
उठसुठ माणसांचा,
राबता तिथे होता.

नाती होती भक्कम,
त्याच्या भिंती सारखी.
चिऊ काऊ अंगणात,
नव्हती मला पारखी.

प्रश्न पोटापाण्याचा,
त्याला स्वप्नांची जोड.
सहवास दुरावता,
नात्यांमध्ये पडे फोड.

मग ढासळल्या भिंती,
दुरावता सर्व नाती.
मतभेदातून वाडे,
कैक गावी कोसळती.

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

अधोगती

आत्मक्लेशाचा बोजा जेव्हा,
मन व्यापून जाई.
पश्चातापाच्या ओझ्याखाली,
जीव दडपून जाई.

बांध फुटला संतापाचा,
कळले कसे नाही.
राखरांगोळी या स्वप्नांची,
टळली कशी नाही.

व्यापून जाई उद्विग्नता,
विचार मनातला.
ऐसपैस जागा मिळे,
पश्चातापाला.

विवेकाचा सुटता हात,
होते जीवन बिकट.
अधोगतीचा शाप लाभतो,
दुःख मिळते फुकट.

रविवार, ८ डिसेंबर, २०१९

प्रेमाचे निर्माल्य

हात तुझिया हाती देता,
मन निर्धास्त हे होई.
वाटे मी तव हरित वेल अन्,
तू फुललेली जाई.

उमलावे तू माझ्या संगे,
बाहुपाशामध्ये.
साचावे मग दवं प्रेमाचे,
तुझ्या पाकळ्यांमध्ये.

वारा अवखळ तुज छेडीता,
शहारावे मम अंग.
विराहाचा लवलेश नसावा,
तव प्रेमात मी दंग.

वेळ येई परि ती शेवटची,
तू सुकून जातसे.
तुटून पडता तू धरेवरी,
प्रेम निर्माल्य होतसे.

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...