शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

प्रारब्ध

खुंट दाढीचे वाढता,
जाणीव वयाची होते.
धावणाऱ्या काळासंगे,
दमछाक जीवा होते.

भूक शमविण्यासाठी
धावणे रोजचे आहे.
खळगे पोटाचे भरी,
ओझे स्वप्नांचे वाहे.

अंतरंगी डोकावण्या,
वेळ मिळतो कुणास.
ईर्षा धावण्याची मनी,
एक तास, प्रति तास.

श्वास अंतिम घेताना,
मन स्वये पुटपुटे.
सदा धावताना गड्या,
माझा मी मला न भेटे.

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

निरागस पिल्लू

भर कोवळ्या उन्हात,
पिल्लू खेळत बसले.
धावणाऱ्या वाहनांचे,
त्यास भान ते कसले.

उडणाऱ्या कागदाशी,
भान विसरून खेळे.
नकळत त्याच्याही ते,
रस्त्याच्या मध्ये पळे.

अतिवेगाने धावत,
एक चारचाकी येई.
पिल्लासाठी काळजात,
धस्स वाटून ते जाई.

अचानक पिल्लापाशी,
गाडी जोरात थांबली.
वेड्या पिल्लाची पावले,
दुडकी घेत धावली.

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

पहाटेच्या कला

अवगुंठीत धुक्याने,
सृष्टी गारठून गेली.
पहाटेच्या काळोखात,
नदी गुडूप झोपली.

मोत्यांसम दवामध्ये,
पाने फुले फळे न्हाली.
अंग चोरून स्वतःशी,
जनावरे झोपी गेली.

पंखांखाली पिले घेती,
ऊब मायेची हवीशी.
रूप सृष्टीचे गोजिरे,
वाटे सर्वांगी नवीशी.

थोडे उजाडू लागता,
घोष चैतन्याचा होई.
मुक्या शांततेच्या पोटी,
किलबिल जन्म घेई.

बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

शब्द बेसावध क्षणी

शब्द बेसावध क्षणी,
घात नात्यांचा करती.
दुभंग क्षणात पडे,
गाठी जन्मांच्या तुटती.

शब्द बेसावध क्षणी,
अंगार पेटून जाती.
विखारे वाढतो दाह,
तुटती क्षणात नाती.

शब्द बेसावध क्षणी,
तिलांजली तत्वां देती.
उठे श्वापद मनीचे,
लचके प्रेमाचे घेती.

शब्द बेसावध क्षणी,
भान विसरून जाती.
जिवाभावाचे सोबती,
जीव एकमेकां घेती.

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

मन फुलपाखरू

हुरहूर माझ्या मनी,
काही नसे ध्यानीमनी.
उगा उचंबळे मन,
मनी विचारांचे तण.

भावनांचा हा कल्लोळ,
डोळा अश्रूंची ओल.
अस्फुट वेदना खोल,
जाणवे तयाची सल.

जीव गांगरून जाई,
लक्ष कशातच नाही.
चिंता वाटे ठाईठाई,
कारणमिमांसा नाही.

अवचित डोळा पडे,
फुलपाखरू ते वेडे.
निरागस त्याच्या लयी,
क्षय चिंतेचा होई.

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

माझ्या बकुळ फुला

फुंकर घालावी वाटे,
तुझ्या जखमा ओल्या.
तुझे प्रारब्ध मी व्हावे,
माझ्या बकुळ फुला.

तुज थोपटावे वाटे,
तुझा जीव दमला.
तुझी निद्रा मी व्हावी,
माझ्या बकुळ फुला.

तुज खुलवावे वाटे,
तुझा त्रागा वाढला.
तुझे स्मित मी व्हावे,
माझ्या बकुळ फुला.

तुज नाचवावे वाटे,
तुझा ताल सुटला.
तुझा पदरव व्हावे,
माझ्या बकुळ फुला.

रविवार, १५ डिसेंबर, २०१९

तुझ्या माझ्या संसाराला

तुझ्या माझ्या संसाराला,
ऊब प्रेमाची देऊ.
सारीपाटात सोंगट्या,
सदा अदबीने ठेऊ.

तुझ्या माझ्या संसाराला,
खत जिव्हाळ्याचे देऊ.
रोप डेरेदार होता,
त्याच्या सावलीत राहू.

तुझ्या माझ्या संसाराला,
जीवापाड माखू न्हाऊ,
इवल्याश्या पावलांना,
बोटा आधार हा देऊ.

तुझ्या माझ्या संसाराला,
मनापासून घडवू.
मृत्यू चाहूल ही देता,
संगे जिवालाही वाहू.

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...