शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

अंतरीचे सरण

आठवणींचा कल्लोळ,
दुःखाचे पडे सावट.
सल खोल रुतलेली,
पीळ होत जाई दाट.

खपल्यांचा फुटे बांध,
भळभळते साकाळ.
अश्वत्थामा हंबरतो,
बरबटते कपाळ.

जखडतो गतकाळ,
उमलत्या भविष्याला.
पिशाच्च मनी वसता,
हैदोस होई देऊळा.

करपे सारी उमेद
कापूररुपी उत्साह.
अंतरी सरण रचे,
चितेचा बसे दाह.

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

बालपण हरवलेले

बालपणीचे सुखक्षण,
आज आठव होती.
फेर धरुन सोबत,
पिंगा भोवती घालती.

धमाल कशी येतसे,
काढल्या जाती खोड्या.
काळाच्या ओघामध्ये,
हरवल्या नाजूक होड्या.

मार्कटलीला चिक्कार,
दोस्त मंडळी फार.
वेळेचे कसले गणित,
सदा उंडारण्या पसार.

स्वच्छंदी तो भूतकाळ,
वर्तमान चौकटीतला.
वाढत्या वयासंगे,
निरागस मी हरवला.

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

लंगडी वेदना

माझ्या तंद्रीत चालता,
पाऊल चुकीचे पडे.
ठेचकाळे बोट माझे,
भेट दगडाशी घडे.

घळाघळा वाहे रक्त,
वेदनांचा येई पूर.
जीव होई दुःखी कष्टी,
दुःखे भरे माझा ऊर.

अवचित दिसे मज,
श्वापद लंगडताना.
मुका जीव जरी कष्टी,
वेदनेला शब्द सुचेना.

माझी बोलकी वेदना,
तिचे कौतुक कितीसे.
दुःख माझे राईपरी,
मज माझे वाटे हसे.

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

तत्वांचे महत्व

तत्व सत्वाची कसोटी,
भाग जीवनाचा असे.
सचोटीशी फारकत,
मग आयुष्यच फसे.

कधी गुंतागुंत वाढे,
कधी आयुष्यच गुंता.
तत्व असे ज्याचा प्राण,
त्यास का वाटे ही चिंता.

सांगोपांग विचारांची,
हवी मनाला सोबत.
मग कमावत जाई,
अनुभवाची दौलत.

राव असो वा तो रंक,
गुंता सारखाच आहे.
तत्वनिष्ठ राहणारा,
त्रिकाळात नित्य राहे.

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

प्रेमाची साक्ष

माझ्या शीतल प्रेमाचा,
चंद्र तुझ्या डोळी आहे.
कलेकलेले वाढतो,
डोळी पाझरत राहे.

माझ्या बेभान प्रेमाचा,
सागर तुझ्या उरी आहे.
सदा भरतीला येतो,
लाट बाहुपाशी राहे.

माझ्या भक्कम प्रेमाचा,
मेरू तुझ्या हाती आहे.
सदा आधाराला येतो,
हात हाती जेव्हा राहे.

माझ्या तरल प्रेमाचा,
ठसा तुझ्या माथी आहे.
आवेगाने उमटतो,
अवघ्राण होत राहे.

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

गमक काव्यनिर्मितीचे

थंडगार वाऱ्यामध्ये,
डोके चालते सुसाट.
चिंतातुर मनासंगे,
काव्यविचारांचा थाट.

अलगदपणे सुचे,
काव्यपंक्ती छोटीशी.
सुरू होई आपोआप,
शब्दजोडणी साजेशी.

काव्यनिर्मिती ही नसे,
सदा सुकर माझ्याशी.
अडवणूक होतसे,
कधी एका कडव्याशी.

फेर नीट धरल्यास,
काव्यविचारांसोबत.
कैक कविता होतात,
येणाऱ्या क्षणासोबत.

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

नात्यांची माती

ओढाताण नात्यांतली,
जीव गांगरून जातो.
वाद टोकाचे इथे हे,
कोण माघार ही घेतो.

भूतकाळ नसे बाकी,
इतका गढूळ कधी.
लोभ, ईर्षा नि मत्सर,
साधतात परि संधी.

मग शकले उडती,
जन्मा प्रेमाच्या नात्यांची.
सर्वां घायाळ करती,
बाणे राखीव भात्यांची.

प्रत्येक जन्माच्या पाठी,
जबाबदारी ही येई.
अहंकाराने परंतू,
माती सुखाची ही होई.

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...