बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

शब्दगंधाची ओळख

खुडबुडले मनात,
शब्द झिंगले क्षणात.
किती दिसांनी उगवे,
काव्यऊर्मीची कनात.

अवचित काही हले,
मन मनाशीच बोले.
झाला कैसा विसंवाद,
शब्द पेटले मनात.

शब्द गुंफती शब्दांत,
काव्यहार ओंजळीत.
ओळखीचा वाटे गंध,
शब्दफुलांचा हातात.

कधी वाटे पारिजात,
मोगऱ्याची बरसात,
शब्दगंधाची ओळख,
वसे खोल या मनात.

बुधवार, ३० जून, २०२१

जन्मणारा बाप

माझा डोळीचा पाळणा,
बाळा तुझ्यासाठी झुले.
सदोदित वर्षावात,
संसारात प्रेम फुले.

किती गोजीरा गोंडस,
जीव इतकुला तुझा.
भोवताली तुझ्या बाळा,
जीव पिंगा घाले माझा.

ऐसे नाजूक हासणे,
वेड लावते जीवाला.
दृष्ट कोणाची न लागे,
माझ्या इवल्या बाळाला.

जोजवता तुज हाती,
झुला जीव माझा घेतो.
क्षणोक्षणी रे सोबत,
बाप जन्मत राहतो.

रविवार, १६ मे, २०२१

आजीचा स्वर्गवास

माझ्या आजीचे मी आज,
गुज तुम्हाला सांगतो..
दादा म्हणे, हाक मारी,
सूर कानात घुमतो..

कधी भेटशील आजे,
आता तुझ्या नातवाला..
कसा काळ आड आला,
घात कायमचा झाला..

हुंदका गुते घशात,
पाणी डोळ्याआड लपे..
आता घेणार कशी तू,
माझे गोड गोड पापे..

स्वामी असेल गं जरी,
आईविना तो भिकारी..
पुन्हा भेटेल का कधी,
गेली आजी माझी प्यारी..

बुधवार, ५ मे, २०२१

कोरोनावर मात

उठे धुरळा जीवांचा,
रोगापाई असा कसा.
गोंधळून जाई जीव,
सावरतो कसाबसा.

जीवनाचे रंग गड्या,
बदलत राहणार.
जाऊ सामोरे तयाला,
उगा का घाबरणार.

बंधूभावाचा हा वसा,
वाढवत जाऊ भावा.
धीरधीराला वाढवी,
हसू ओठांवर ठेवा.

काळजीने जीव तुटे,
इथे सगळ्या भावांचा.
कैसा राहील शिल्लक,
कोरोना असा नावाचा.

सोमवार, २२ मार्च, २०२१

अश्रूवर्षा

अवकाळी पावसात,
तुझे दूर जाणे.
प्रेमवेड्या चातकाचे,
भेसूर वाटे गाणे.

गडगडणाऱ्या ढगांमध्ये,
जोश वाटत नाही.
गरमागरम चहावरती,
साय दाटत नाही.

कोसळणाऱ्या धारांचेही,
गटार होऊन जाई.
अंधारलेल्या जगात,
एकटेपणा साठत राही.

हवेत गारवा कमी,
कुबटपणा जास्त वाटे.
पापण्यांच्या कडांवरती,
अश्रूवर्षा दाटे.

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

भाच्यांची आठवण

शांततेत सकाळ आज,
कल्ला नाही कुठला!
शशी समुचा मामा जरा,
चाचपडतच उठला!

नाही अस्ताव्यस्त अंथरूण,
नाही मामाचा घोष.
बोचणाऱ्या शांततेचा,
वाटे आज रोष.

डॉगीचे स्वैर धावणे,
आज हरवून बसले.
वात्सल्याचे हात माऊला,
कुठेच ना ते दिसले.

आज्जीचा गोंधळ होई,
काही हरवले आज.
पसाऱ्याचा घराला,
नाही उरला साज.

जुगलबंदी मामीसोबत,
कोण करणार आता?
रविवारची गम्मत न्यारी,
कोण मारणार बाता?

गुरुवार, ९ जुलै, २०२०

येशील का गं राधे?

अडकलोय मी कुठेतरी,
तुझ्या असण्यामध्ये.
माझे असणे मान्य करून,
येशील का गं राधे?

तडफडतोय मी कुठेतरी,
तुझ्या नसण्यामध्ये.
माझे प्राण धन्य करून,
येशील का गं राधे?

हरवतोय मी कुठेतरी,
तुझ्या आठवामध्ये.
माझे अर्घ्य दान घेऊन,
येशील का गं राधे?

संपतोय मी कुठेतरी,
तुझ्या आभासामध्ये.
माझा श्वास परत घेऊन,
येशील का गं राधे?

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...