शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

लाडिक लेखणी

हाती घेता खतावणी,
आज रुसली लेखणी.
गाल फुगवून बसे,
म्हणे मज कोण पुसे 

मनी सुचता तुजला,
शाई भिडे कागदाला.
आटता मनी विचार,
माझा पडतो विसर.

गाऱ्हाणे ऐकून तिचे,
स्मित उमटे गमतीचे.
गोंजारता तिज बोटांनी,
हसू लागली लेखणी.

म्हणे स्वच्छंदे बागडू दे,
पानावर मज नाचू दे.
होता मम पदन्यास,
पूर्ण होई काव्य ध्यास.

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

कळीची कळ

कळी उदरी रुजता,
जग विषण्ण होतसे.
जग पाहण्या आधीच,
मूळ खुडले जातसे.

कळी वयात येताना,
उमलते, बागडते.
वखवखले हे जग,
चुरगळून टाकते.

कळी बांधते आनंदे,
गाठ रेशमी संसारी.
लोभ पैशाचा सुटता,
कळी जळते सासरी.

वार्धक्य पाठी लागता,
कळी आसरा मागते.
पोटच्या ह्या लेकरांनी,
कशी लाथाडली जाते.

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

वृक्षवल्ली

अचंबित होते व्हाया,
अशी वृक्षाची किमया.
ऊन पाऊस झेलतो,
सावली मायेची देतो.

घाण वायू हा प्राशतो,
प्राणवायू सर्वा देतो.
पक्षी आसरा हा घेती,
खोपा बांधून रहाती.

फुले फळे लगडती,
जीवा आनंद ही देती.
प्राणी पक्षी बागडती,
जगा आनंद ही देती.

बुद्धिमान जगी जीव,
परि मनामध्ये हाव.
घाव कुऱ्हाडीचे पायी,
जीव निष्पापाचा घेई.

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

झोपेचा चक्का जाम

काल रात्री गड्या मला,
स्वप्न पडले भारी.
रस्ता होता मोकळा अन्,
वेगात होती स्वारी.

हॉर्न वाजवून पिडणारे,
पापी आत्मे नव्हते.
रस्ता अडवून चालणारे,
महाभाग ही नव्हते.

मौज ती येई दौडाया मग,
माझी प्रिय दुचाकी.
आनंदाला भरते येई,
कसली चिडचिड बाकी.

कंठशोष तो घड्याळ करता,
जाग येई उठवाया.
गर्दीत आता झोकून द्याया,
त्वरा करा, आवरया.

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

भक्तीचा गाभारा

प्रश्न पडे प्रत्येकाला,
मानावे का देवाजीला?
कोडे सुटते हे त्याला,
जो हात घाली गाभ्याला.

कुणी देव शोधे दगडात,
कुणी शोधे त्यास कामात.
कुणी अडके ह्या प्रश्नात,
का अडकावे देवात.

हे कोडे तेथेची सुटते,
श्रद्धा ज्या मनात वसते.
जर अवडंबर माजते,
श्रद्धा ती डोळस नसते.

श्रद्धा खरी असल्यास,
भक्तीची ओढ ही खास.
मग असे सदा उल्हास,
देवाचे दर्शन खास.

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

संसारधर्म

संसाराची गम्मत कळण्या,
खावा लग्नाचा लाडू.
भले भले गार पडतात,
असेल कुणीही भिडू.

लोळत पडणारे कुंभकर्ण,
पिशवी घेऊन धावतात.
दळण, किराणा, भाजीपाला,
यादी लिहू लागतात.

वाद कोण जिंकते याला,
अर्थ नसतो कधी.
शेवट गोड करते कोण,
याची थोरवी आधी.

संसार नेटका करता करता,
माणूस घडत जाई.
जीवनसंध्या ही आनंदे,
मृत्यू कवेत घेई.

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

लपंडाव तणावाशी

तणाव मनात शिरण्यापूर्वी,
धरून बसलो दबा.
म्हटले बेट्या आज तुझा,
नक्की घेतो ताबा.

नेहमी मला गाठतोस कसा,
बेसावध त्या क्षणी.
अलगद अडकून जातो मी,
नसता ध्यानीमनी.

मग होतो मनस्ताप,
संताप गड्या भारी.
मला फसवून खुश होते,
पठ्ठ्या तुझी स्वारी.

तुझी वाट बघता बघता,
चिडचिड माझी वाढली.
मनात अलगद शिरून तू,
खिंड सहज जिंकली.

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

ज्ञानाचा महिमा

ज्ञान वाटता जगाशी,
ज्ञान वाढत राहते.
ज्ञान कोंडता स्वतःशी,
ज्ञान आटत राहते.

ज्ञान जोडता विचारे,
शहाणपण येते.
ज्ञाने वाईट चिंतीता,
बुद्धी रसातळा जाते.

ज्ञाने उघडते मनी,
जगासाठी हे कवाड.
ज्ञान साकाळता मनी,
दुःख भेटे जीवापाड.

संग ज्ञानाचा धरता,
जगी देवत्व भेटते.
दंश अज्ञानाचा होता,
जगी यादवी माजते.

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

कधी वाटते मजला

कधी वाटते मजला,
तुझ्या डोई फुल व्हावे.
व्हावे सुगंधी दरवळ,
तुज सुखावून जावे.

कधी वाटते मजला,
तुझ्या कानी डूल व्हावे.
प्रेमगीत माझ्या हृदयी
तुज कानी गुणगुणावे.

कधी वाटते मजला,
तुझे काकण मी व्हावे.
तव कोमलशा हातांशी,
हितगुज सदा करावे.

कधी वाटते मजला,
तुझे पैंजण मी व्हावे.
तव नाजूकशा चालीचा,
मी पदरव होत जावे.

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९

आवराआवर

बाहेर जायचे म्हणजे तुला,
लागतो किती वेळ.
घड्याळाच्या वेगाशी मग,
बसणार कधी मेळ?

पोहोचायच्या वेळेला तू,
लागतेस सगळे आवरू.
मग होई गडबड गोंधळ,
काय काय सावरू?

दारे खिडक्या लावा लवकर,
कबूतरांचा उच्छाद.
नळ गॅस बंद करा,
व्हायची नसली ब्याद.

झोपेत काय बडबडताय,
म्हणत उठवलेस मला.
उशीर होईल म्हणता म्हणता,
चक्क घोरू लागला.

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

लटका राग

गाल फुगती जेव्हा,
तुझे रागाने साजणे.
घनदाट होई शांतता,
टोचे अनोळखी वागणे.

लाल होई शेंडा,
तुझ्या नाकाचा साजणे.
मज कोडे पडते अवघड,
आता कसले हे बहाणे.

आठ्या पडती जेव्हा,
तुझ्या कपाळी साजणे.
सुन्न होई माझे मन,
ओठी शब्दांचे दाटणे.

अलवार तुझे मग माझ्या,
बाहुपाशात शिरणे.
हनुवटी उचलता किंचित,
डोळे डोळ्यांशी लाजणे.

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१९

प्रेमाचे प्राक्तन

उधळीता प्रेम रंग,
जीव आरवात दंग.
मिळे त्यास कधी संग,
ओढ आहे की हा चंग.

जन्मलेल्या सर्व जिवा,
मेवा प्रेमाचा हा हवा.
कधी भेटेल हा रावा,
झरा चैतन्याचा नवा.

जाळे फेकून प्रेमाचे,
स्वप्न बघे मासोळीचे.
ओझे ना ह्या बंधनाचे,
कढ उत्साहाचे साचे.

गुंतागुंत मोठी होई,
वासनेचा गंध येई.
प्रेम कोमेजून जाई,
दुःख दिसे ठाई ठाई.

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

धावते जीवन

रहदारी स्थिरावता,
आजूबाजूला पाहता.
चिंतातुर जग भासे,
गळी जीवनाचे फासे.

धावाधाव करतोय,
चिंता उरी वाहतोय.
ओझे जगण्याचे पाठी,
काळजीही सदा ओठी.

कुठे जायचे, कशाला,
थांगपत्ता नाही त्याला.
एक ईर्षा मनी भारी,
थांबायाचे नाही परि.

क्षण आनंदाचे सदा,
पायी तुडवत जायी.
दुःख उरता हे मागे,
ऊर बडवत राही.

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

सार जीवनाचे

दुःख सोडत नसते,
पाठलाग हे मानवा.
आहे त्या क्षणामधेच,
तूच गोडवा मानावा.

चिरफाड होत राही,
भावनांची येथे सदा.
तरी खंबीर राहा तू,
होऊ नको देऊ त्रेधा.

डावलला तू जाशील,
काही चूक नसताना.
परि मोडू देऊ नको,
आजन्म तुझा बाणा.

सुख दुःखाचा हा खेळ,
जीवना देई आकार.
घाव टाकीचे सोसता,
देव पाषाणी साकार.

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

मायेचा चारा

सडा पडता उन्हाचा,
वारा उबदार सुटे.
क्षितीजाच्या पोटातून,
गोल तांबडे हे फुटे.

सुरू होई किलबिल,
पिल्ले घरटी उपाशी.
दाणा शोधून आणण्या,
माय झेपावे आकाशी.

पिल्ले एकटी सोडता,
जीव माऊलीचा तुटे.
ओढा कर्तव्याचा भारी,
नभी मायेला ह्या रेटे.

जीव कावराबावरा,
दाही दिशा धुंडाळतो.
दाणा घेउनी फिरता,
पूर मायेचा दाटतो.

साथ तुझी

हात तुझा माझ्या हाती,
एक दिवा, दोन वाती.
देऊ प्रकाश जगती,
आनंदाने.

जन्मोजन्माच्या ह्या गाठी,
प्रेम वाढे प्रेमासाठी.
एक गीत, दोघां ओठी,
गा सुखाने.

घडवूया एक जग,
आळवत प्रेम राग.
निनादेल सारे जग,
ह्या सुराने.

ओंजळीत ही ओंजळ,
विसावे येणारा काळ.
जीवा जीवाचा हा मेळ,
चैतन्याने.

चाहूल थंडीची

काजळी ढगांची जाते,
थंडी गुलाबी ही येते.
नवचैतन्य लाभते,
या जगाला.

दिस उजाडे उशिरा,
रंग सूर्याचा शेंदरा.
हुडहुड, येता वारा,
या जीवाला.

ऊब मायेची लपेटे,
जीव कोवळे दुपटे.
निज लपेटून खेटे,
लडिवाळा.

लख्ख प्रकाश पडतो,
चिवचिवाट थांबतो.
लगबगीने धावतो,
निर्वाहाला.

रंग जीवनाचे

दिस उजाडत जाई,
दिस मावळत जाई.
भूतकाळाच्या कुशीत,
आठवण झोपी जाई.

कधी सुख कोंदलेले,
कधी दुःख कोंडलेले.
अवीट त्या जीवनाचे,
क्षण कण सांडलेले.

कधी सुटे सो सो वारा,
संकटांच्या चाहुलीचा.
मनी निश्चयाचा थारा,
आशीर्वाद माऊलीचा.

कधी वर्षाव होई,
आनंदाच्या पावसाचा.
नाचे चिंबाड भिजूनी,
मोर माझिया मनाचा.

जोगवा प्रेमाचा

दुःख तुझिया मनाचे,
माझ्या मना गिळू दे ना.
सुख माझिया मनाचे,
तुझ्या मना माळू दे ना.

कढ तुझ्या वेदनांचे,
माझ्या डोळी स्फुंदू दे ना.
ओढ माझ्या आनंदाची,
तुझ्या भाळी गोंदू दे ना.

व्रण तुझ्या नियतीचे,
माझ्या जन्मा लेवू दे ना.
क्षण माझ्या आनंदाचे,
तुझ्या भाग्या नेवू दे ना.

स्वत्व तुझ्या जिवातले,
माझ्या स्वत्वा खोडू दे ना.
प्राण माझ्या कायेतले,
तुझ्या प्राणा भिडू दे ना.

मनाचे मनसुबे

टकटक घड्याळाची,
टकटक ह्या पळाची.
मन फोडाफोड करी,
जळस्थळाची, काळाची.

मन धावत सुटते,
पळणाऱ्या क्षणामागे.
मग पापणी मिटते,
जोडताना स्वैर धागे.

कधी जंजाळ हे बने,
कैक विचारांसोबती.
चुटकी सरशी सुटे,
कधी गुंगलेली मती.

मना, गड्या तू रे भारी,
सरड्याची ही खुमारी.
ठाव ठिकाणा शोधण्या,
येते मौज मज न्यारी.

तिढा सत्तेचा

शाई माझ्या बोटावरची,
अशीच कुत्सित हसली.
मतदारराजा, काय झाले,
सत्तास्थापना फसली.

दहावं झालं, तेरावं झालं,
महिना होईल आता.
निवडणुकीला वर्ष व्हायचा,
का अवकाश हा बघता.

जनता झाली केविलवाणी,
समस्यांनी पिचून.
मढं तिचं गाडणार का,
सरण सत्तेचं रचून?

वेळकाढूपणालाही,
शेवट-अंत असतो.
ऐटीत मतदान करूनी राजा,
नेहमीच का तू फसतो?

काय वाटत असेल

उमलणाऱ्या कळीला,
काय वाटत असेल.
अस्फुट तिच्या अस्तित्वाला,
कोणी खुडत असेल.

हंबरणाऱ्या वासराला,
काय वाटत असेल.
भरल्या पान्ह्यापासून त्याला,
तोडले जात असेल.

इवल्याश्या सुरवंटाला,
काय वाटत असेल.
फुलपाखरू होण्या आधी,
मारले जात असेल.

रक्ताळलेल्या गर्भाला,
काय वाटत असेल.
जन्मा येण्या पूर्वीच त्याला,
पाडले जात असेल.

मनाचे मनन

मन आनंद उधाण,
मन देवाजीचे दान.

मन चपळ ते भारी,
मन वाऱ्यावरी स्वारी.

मन पावसाचा पिंगा,
मन हरी पांडुरंगा.

मन प्रकाशित सत्य,
मन अस्थिर ते नित्य.

मन वेडगळ भारी,
येता तऱ्हा जगी न्यारी.

मन आक्रंदते दुःख,
मुख फिरवता सुख.

मन मनन मनन,
एक क्षण, प्रति क्षण.

वेदनेचा हुंकार

मिशी पिळत, डोके खाजवत,
विचार करत बसलो...
भूतकाळात डोकावताना,
स्वतःशीच हसलो...

दिसामाजी दिस उडाले,
कधीच कळले नाही...
नात्यांचेही अर्थ बदलले,
परि उमगले नाही...

दुःखांचा तो गोफ सोडण्या,
जीव झाला कष्टी...
दृष्टीलाही कळले ना कधी,
आड गेली सृष्टी...

गुंता सगळ्या दुःखांचा मग,
सोडलाच पाहिजे का...
येणारा हा श्वासच अंतिम,
कुढलाच पाहिजे का...

ओला दुष्काळ

उगा ढगाड गळते,
रान सारे साकाळते,
अवकाळी उमळते,
पावसाने...

उभी पिकं ही झोपली,
सारी दैना आता झाली,
काय अवकृपा झाली,
देवाजीची...

कंठ येता ह्यो दाटून,
डोळे घेतोय मिटून,
भीती वाटं मनातून,
पाण्याची...

आता नाही कुणी वाली,
सरकार झिम्मा घाली,
पंचनामा हा की खिल्ली,
बळीराजा...

सामान्यातुनी असामान्य

सामान्यातुनी असामान्य तो,
कसा घडत असतो..
कवटाळूनी; दुःख कवेशी,
कधी रडत नसतो..

सूर्य उगवता, घेऊन येई,
गिरी अडचणींचा..
त्वेषाने तव पायी तुडविशी,
गर्व भव्यतेचा..

हेटाळणी ती; पडता पदरी,
गर्विष्ठांकडूनी..
ध्येयासक्ती; उसळू लागते,
नसानसांतूनी..

दांभिकतेचे; होता आक्रमण,
स्वत्व ठेचकाळे..
संधी समजुनी; तावसुलाखुनी,
दिव्यता झळाळे..

जीवनाचे गमक

कसे जगायचे... कुढत कुढत,
की षड्रिपूंना चिमटे काढत..
निर्णय तुमच्या हातात आहे,
जगणे प्रत्येक श्वासात आहे..

पेकाटात दुःखाच्या,
मनसोक्त घालावी लाथ...
मग म्हणाल स्वतःहून,
ए जिंदगी, क्या बात!

किड्यामुंग्यांसारखे मरणे,
तुम्ही पसंत कराल का?
देवाजीचे जीवनरुपी दान,
उसवणे पसंत कराल का?

जीवनाचा खरा गाभा,
प्रेम वाटण्यातच असतो..
ओंजळभर उधळल्यास,
अविरत वर्षाव होत असतो..

दमवणारी भाकर

नगर रोड वर शिरता शिरता,
बस म्हणाली कुथून..
कंटाळत नाहीस का प्रवासाला,
नेहमी रहदारीत जातोस रुतून..

तिच्या अनपेक्षित प्रश्नाने,
क्षणभर विचारात पडलो...
मिश्किल कटाक्ष टाकत तिला,
मी हसून म्हणालो...

सामान्य असलो तरी भाकरीचा,
प्रश्न असामान्य आहे..
ऑफिस मध्ये बॉस आणि घरी,
बायको वाट पाहे..

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...