शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

जोगवा प्रेमाचा

दुःख तुझिया मनाचे,
माझ्या मना गिळू दे ना.
सुख माझिया मनाचे,
तुझ्या मना माळू दे ना.

कढ तुझ्या वेदनांचे,
माझ्या डोळी स्फुंदू दे ना.
ओढ माझ्या आनंदाची,
तुझ्या भाळी गोंदू दे ना.

व्रण तुझ्या नियतीचे,
माझ्या जन्मा लेवू दे ना.
क्षण माझ्या आनंदाचे,
तुझ्या भाग्या नेवू दे ना.

स्वत्व तुझ्या जिवातले,
माझ्या स्वत्वा खोडू दे ना.
प्राण माझ्या कायेतले,
तुझ्या प्राणा भिडू दे ना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...