मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

साखरझोपेचे सुख

साखरझोप आवडे,
पांघरूणाच्या ऊबीत.
वाटे पहुडलो जसा,
एका छोट्याश्या डबीत.

झोप दाट होत जाता,
स्वप्ने पडती अनेक.
हसू येई स्वतःवरी,
आठवता स्वप्न कैक.

बांधली जाती इमले,
कैक मजली अचाट.
जगावेगळे जग ते,
त्यास कसली चौकट.

अडखळे अचानक,
दौड स्वप्ननगरात.
धप्प उडी ह्या जगात,
जागे होता मी क्षणात.

सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

निर्विवाद संवाद

आनंदी नात्याचे कोष,
संवादात लपलेले.
शब्दशब्दांची शृंखला,
बंध रेशमी गुंफले.

शब्द धीराचा एखादा,
नवचेतना जागवी.
भेदरलेल्या सख्याला,
डोस उर्मीचे पाजवी.

सुसंवादाने टळती,
भावनिक कडेलोट.
क्षण सुखाचे वाचती,
लागते न गालबोट.

बोलका प्राणी मनुष्य,
दान संवादाचे त्याला.
रोपटे नात्याचे फुले,
खत संवादाचे त्याला.

रविवार, २९ डिसेंबर, २०१९

ग प्रिये

मन पिंगा घालतसे,
तुझ्या भोवती ग प्रिये.
जीव माझा गुंततसे,
तुझ्या जीवाशी ग प्रिये.

तुझ्या तळहातावरी,
भाग्यरेषा मी ग प्रिये.
तुझ्या अनामिकेतली,
अंगठी मी ग प्रिये.

तुझ्या केशसंभारात,
बट मी ग प्रिये.
तुझ्या गोऱ्या गालावर,
लाली मी ग प्रिये.

तुझा भूत-वर्तमान,
भविष्य मी ग प्रिये.
तुझ्या अंतिम श्वासाचा,
क्षण मी ग प्रिये.

शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

अंतरीचे सरण

आठवणींचा कल्लोळ,
दुःखाचे पडे सावट.
सल खोल रुतलेली,
पीळ होत जाई दाट.

खपल्यांचा फुटे बांध,
भळभळते साकाळ.
अश्वत्थामा हंबरतो,
बरबटते कपाळ.

जखडतो गतकाळ,
उमलत्या भविष्याला.
पिशाच्च मनी वसता,
हैदोस होई देऊळा.

करपे सारी उमेद
कापूररुपी उत्साह.
अंतरी सरण रचे,
चितेचा बसे दाह.

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

बालपण हरवलेले

बालपणीचे सुखक्षण,
आज आठव होती.
फेर धरुन सोबत,
पिंगा भोवती घालती.

धमाल कशी येतसे,
काढल्या जाती खोड्या.
काळाच्या ओघामध्ये,
हरवल्या नाजूक होड्या.

मार्कटलीला चिक्कार,
दोस्त मंडळी फार.
वेळेचे कसले गणित,
सदा उंडारण्या पसार.

स्वच्छंदी तो भूतकाळ,
वर्तमान चौकटीतला.
वाढत्या वयासंगे,
निरागस मी हरवला.

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

लंगडी वेदना

माझ्या तंद्रीत चालता,
पाऊल चुकीचे पडे.
ठेचकाळे बोट माझे,
भेट दगडाशी घडे.

घळाघळा वाहे रक्त,
वेदनांचा येई पूर.
जीव होई दुःखी कष्टी,
दुःखे भरे माझा ऊर.

अवचित दिसे मज,
श्वापद लंगडताना.
मुका जीव जरी कष्टी,
वेदनेला शब्द सुचेना.

माझी बोलकी वेदना,
तिचे कौतुक कितीसे.
दुःख माझे राईपरी,
मज माझे वाटे हसे.

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

तत्वांचे महत्व

तत्व सत्वाची कसोटी,
भाग जीवनाचा असे.
सचोटीशी फारकत,
मग आयुष्यच फसे.

कधी गुंतागुंत वाढे,
कधी आयुष्यच गुंता.
तत्व असे ज्याचा प्राण,
त्यास का वाटे ही चिंता.

सांगोपांग विचारांची,
हवी मनाला सोबत.
मग कमावत जाई,
अनुभवाची दौलत.

राव असो वा तो रंक,
गुंता सारखाच आहे.
तत्वनिष्ठ राहणारा,
त्रिकाळात नित्य राहे.

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

प्रेमाची साक्ष

माझ्या शीतल प्रेमाचा,
चंद्र तुझ्या डोळी आहे.
कलेकलेले वाढतो,
डोळी पाझरत राहे.

माझ्या बेभान प्रेमाचा,
सागर तुझ्या उरी आहे.
सदा भरतीला येतो,
लाट बाहुपाशी राहे.

माझ्या भक्कम प्रेमाचा,
मेरू तुझ्या हाती आहे.
सदा आधाराला येतो,
हात हाती जेव्हा राहे.

माझ्या तरल प्रेमाचा,
ठसा तुझ्या माथी आहे.
आवेगाने उमटतो,
अवघ्राण होत राहे.

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

गमक काव्यनिर्मितीचे

थंडगार वाऱ्यामध्ये,
डोके चालते सुसाट.
चिंतातुर मनासंगे,
काव्यविचारांचा थाट.

अलगदपणे सुचे,
काव्यपंक्ती छोटीशी.
सुरू होई आपोआप,
शब्दजोडणी साजेशी.

काव्यनिर्मिती ही नसे,
सदा सुकर माझ्याशी.
अडवणूक होतसे,
कधी एका कडव्याशी.

फेर नीट धरल्यास,
काव्यविचारांसोबत.
कैक कविता होतात,
येणाऱ्या क्षणासोबत.

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

नात्यांची माती

ओढाताण नात्यांतली,
जीव गांगरून जातो.
वाद टोकाचे इथे हे,
कोण माघार ही घेतो.

भूतकाळ नसे बाकी,
इतका गढूळ कधी.
लोभ, ईर्षा नि मत्सर,
साधतात परि संधी.

मग शकले उडती,
जन्मा प्रेमाच्या नात्यांची.
सर्वां घायाळ करती,
बाणे राखीव भात्यांची.

प्रत्येक जन्माच्या पाठी,
जबाबदारी ही येई.
अहंकाराने परंतू,
माती सुखाची ही होई.

शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

प्रारब्ध

खुंट दाढीचे वाढता,
जाणीव वयाची होते.
धावणाऱ्या काळासंगे,
दमछाक जीवा होते.

भूक शमविण्यासाठी
धावणे रोजचे आहे.
खळगे पोटाचे भरी,
ओझे स्वप्नांचे वाहे.

अंतरंगी डोकावण्या,
वेळ मिळतो कुणास.
ईर्षा धावण्याची मनी,
एक तास, प्रति तास.

श्वास अंतिम घेताना,
मन स्वये पुटपुटे.
सदा धावताना गड्या,
माझा मी मला न भेटे.

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

निरागस पिल्लू

भर कोवळ्या उन्हात,
पिल्लू खेळत बसले.
धावणाऱ्या वाहनांचे,
त्यास भान ते कसले.

उडणाऱ्या कागदाशी,
भान विसरून खेळे.
नकळत त्याच्याही ते,
रस्त्याच्या मध्ये पळे.

अतिवेगाने धावत,
एक चारचाकी येई.
पिल्लासाठी काळजात,
धस्स वाटून ते जाई.

अचानक पिल्लापाशी,
गाडी जोरात थांबली.
वेड्या पिल्लाची पावले,
दुडकी घेत धावली.

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

पहाटेच्या कला

अवगुंठीत धुक्याने,
सृष्टी गारठून गेली.
पहाटेच्या काळोखात,
नदी गुडूप झोपली.

मोत्यांसम दवामध्ये,
पाने फुले फळे न्हाली.
अंग चोरून स्वतःशी,
जनावरे झोपी गेली.

पंखांखाली पिले घेती,
ऊब मायेची हवीशी.
रूप सृष्टीचे गोजिरे,
वाटे सर्वांगी नवीशी.

थोडे उजाडू लागता,
घोष चैतन्याचा होई.
मुक्या शांततेच्या पोटी,
किलबिल जन्म घेई.

बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

शब्द बेसावध क्षणी

शब्द बेसावध क्षणी,
घात नात्यांचा करती.
दुभंग क्षणात पडे,
गाठी जन्मांच्या तुटती.

शब्द बेसावध क्षणी,
अंगार पेटून जाती.
विखारे वाढतो दाह,
तुटती क्षणात नाती.

शब्द बेसावध क्षणी,
तिलांजली तत्वां देती.
उठे श्वापद मनीचे,
लचके प्रेमाचे घेती.

शब्द बेसावध क्षणी,
भान विसरून जाती.
जिवाभावाचे सोबती,
जीव एकमेकां घेती.

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

मन फुलपाखरू

हुरहूर माझ्या मनी,
काही नसे ध्यानीमनी.
उगा उचंबळे मन,
मनी विचारांचे तण.

भावनांचा हा कल्लोळ,
डोळा अश्रूंची ओल.
अस्फुट वेदना खोल,
जाणवे तयाची सल.

जीव गांगरून जाई,
लक्ष कशातच नाही.
चिंता वाटे ठाईठाई,
कारणमिमांसा नाही.

अवचित डोळा पडे,
फुलपाखरू ते वेडे.
निरागस त्याच्या लयी,
क्षय चिंतेचा होई.

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

माझ्या बकुळ फुला

फुंकर घालावी वाटे,
तुझ्या जखमा ओल्या.
तुझे प्रारब्ध मी व्हावे,
माझ्या बकुळ फुला.

तुज थोपटावे वाटे,
तुझा जीव दमला.
तुझी निद्रा मी व्हावी,
माझ्या बकुळ फुला.

तुज खुलवावे वाटे,
तुझा त्रागा वाढला.
तुझे स्मित मी व्हावे,
माझ्या बकुळ फुला.

तुज नाचवावे वाटे,
तुझा ताल सुटला.
तुझा पदरव व्हावे,
माझ्या बकुळ फुला.

रविवार, १५ डिसेंबर, २०१९

तुझ्या माझ्या संसाराला

तुझ्या माझ्या संसाराला,
ऊब प्रेमाची देऊ.
सारीपाटात सोंगट्या,
सदा अदबीने ठेऊ.

तुझ्या माझ्या संसाराला,
खत जिव्हाळ्याचे देऊ.
रोप डेरेदार होता,
त्याच्या सावलीत राहू.

तुझ्या माझ्या संसाराला,
जीवापाड माखू न्हाऊ,
इवल्याश्या पावलांना,
बोटा आधार हा देऊ.

तुझ्या माझ्या संसाराला,
मनापासून घडवू.
मृत्यू चाहूल ही देता,
संगे जिवालाही वाहू.

शनिवार, १४ डिसेंबर, २०१९

दुःख माझे वाटे खोटे

ढेकर तृप्तीचा येता,
मनी समाधान वाटे.
कैक उपाशी झोपती,
दुःख माझे वाटे खोटे.

पायी पादत्राण माझ्या,
चालणे सहज वाटे.
कैक अनवाणी जन्म,
दुःख माझे वाटे खोटे.

पहुडता दिसाकाठी,
ऊब गादीची ही भेटे.
कैक कातळी झोपती,
दुःख माझे वाटे खोटे.

हृदयाची धडधड,
श्वास क्षणोक्षणी भेटे.
कैक जीव मावळती,
दुःख माझे वाटे खोटे.

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

भरकटलेला वाटसरू

तिळतिळ तुटणारे,
मन ढाळीयते अश्रू.
दुःख काटेरी बोचते,
काय काय सावरू.

नशिबाचा वेढा फिरे,
ग्रह लागतात फिरू.
फाटक्यात पडे पाय,
मन लागते बावरू.

काय खरे, काय खोटे,
शोधणे महाकठीण.
चिंता करून बुद्धीला,
येऊ लागतो शीण.

गळा टोचतो आवंढा,
डोळे लागती पाझरू.
नियतीच्या खेळामध्ये,
भरकटे वाटसरू.

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

नदी की नांदी?

जेव्हा तुंबलेली नदी,
हळूच स्फुंदून रडे.
सांगे मज मनोगत,
म्हणे मांडले हे मढे.

सांडपाण्याचा विसर्ग,
माझ्या उदरात जाई.
तिथूनच रोगराई,
जगामध्ये जन्म घेई.

निर्माल्य तुम्हा फेकण्या,
मोठी मौज सदा वाटे.
पाणी पुराचे वाढता,
डोळा पाणी कोणा दाटे?

हा अंत नाही माझा,
आत्मघात तुझा आहे.
घोडचूका तू करता,
विनाशाची नांदी आहे.

बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

आभार देवा मानतो

तहानलेल्या ह्या जीवाला,
घोट पाण्याचा भेटतो.
मनोमन मग जीव,
आभार देवा मानतो.

धावाधाव करताना,
मृत्यू चकवा हा देतो.
पुनर्जन्मच हा जणू,
आभार देवा मानतो.

उसळता आगडोंब,
भुके जीवही थकतो.
मुखी घास हा मिळता,
आभार देवा मानतो.

मीच देवाजीचे दान,
श्वास तव कृपे घेतो.
लवत्या पापणी सवे,
आभार देवा मानतो.

मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

कोसळणारा वाडा

एक वाडा चिरेबंदी,
माझा गावाकडे होता.
उठसुठ माणसांचा,
राबता तिथे होता.

नाती होती भक्कम,
त्याच्या भिंती सारखी.
चिऊ काऊ अंगणात,
नव्हती मला पारखी.

प्रश्न पोटापाण्याचा,
त्याला स्वप्नांची जोड.
सहवास दुरावता,
नात्यांमध्ये पडे फोड.

मग ढासळल्या भिंती,
दुरावता सर्व नाती.
मतभेदातून वाडे,
कैक गावी कोसळती.

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

अधोगती

आत्मक्लेशाचा बोजा जेव्हा,
मन व्यापून जाई.
पश्चातापाच्या ओझ्याखाली,
जीव दडपून जाई.

बांध फुटला संतापाचा,
कळले कसे नाही.
राखरांगोळी या स्वप्नांची,
टळली कशी नाही.

व्यापून जाई उद्विग्नता,
विचार मनातला.
ऐसपैस जागा मिळे,
पश्चातापाला.

विवेकाचा सुटता हात,
होते जीवन बिकट.
अधोगतीचा शाप लाभतो,
दुःख मिळते फुकट.

रविवार, ८ डिसेंबर, २०१९

प्रेमाचे निर्माल्य

हात तुझिया हाती देता,
मन निर्धास्त हे होई.
वाटे मी तव हरित वेल अन्,
तू फुललेली जाई.

उमलावे तू माझ्या संगे,
बाहुपाशामध्ये.
साचावे मग दवं प्रेमाचे,
तुझ्या पाकळ्यांमध्ये.

वारा अवखळ तुज छेडीता,
शहारावे मम अंग.
विराहाचा लवलेश नसावा,
तव प्रेमात मी दंग.

वेळ येई परि ती शेवटची,
तू सुकून जातसे.
तुटून पडता तू धरेवरी,
प्रेम निर्माल्य होतसे.

शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

जीव घराचा तुटतो

वखवखल्या जगाचा,
ताबा सतत सुटतो.
लेक घर सोडताना,
जीव घराचा तुटतो.

वासनांध सावल्यांचा,
वेढा जगाला पडतो.
शील ओरबडताना,
जीव घराचा तुटतो.

दर्प दांभिकपणाचा,
आदर्शवादास येतो.
लेक चुरगळताना,
जीव घराचा तुटतो.

स्वत्व बाईमाणसाचे,
ढोंगी समाज जाळतो.
लेक कोळसा होताना,
जीव घराचा तुटतो.

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

हंबरणारा बाप

लेक निघता सासरा,
डोळा अश्रूंच्या धारा.
काळीज बापाचे तुटे,
प्राण कंठाशी दाटे.

जन्म परीचा आठवे,
बोट मुठीत साठवे.
अवघ्राण ओठ करी,
रूप आज बाप स्मरी.

मजबूत खांद्यांवरी,
बसे मौजेत ती परी.
बाप होई तिची स्वारी,
खबडक घोडा करी.

तंद्री तुटे हुंदक्याने,
गळा लेकीचे पडणे.
बांध फुटे भावनांचा,
हंबरडा हा बापाचा.

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

साथ सावलीची

तिरीप उन्हाची पडे,
भेट सावलीशी घडे.
मन विचारात पडे,
विसरतो तुज गडे.

देते सदा ही सोबत,
हात सोडी अंधारात.
सावलीत निज घेई,
ऊन्ही पाठलाग होई.

मन अचंबित होई,
कशी दमत ही नाही.
दिसतसे ठाई ठाई,
सदा पायाशी ही राही.

राजा असो वा भिकारी,
भेदभाव ना ती करी.
देह झोपे चितेवरी,
राखेचीही साथ धरी.

बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

बंधुभाव

ऊठा मंडळी ऊठा,
या आयुष्याला भेटा.
जीवनी अंधाऱ्या वाटा,
सर्वां प्रकाश हा वाटा.

पेरावे ते उगवते,
जग असेच चालते.
आपुलकी ही पेराल,
सदा आनंद भोगाल.

दुःख दुःखास ओढते,
दैन्य अजूनी वाढते.
सुख मारता फुंकर,
चढे चैतन्याचा ज्वर.

ओढ आपुली वाढेल,
बंधुभाव हा वाढेल.
वेचू आनंदाचे क्षण,
जगी फुलवू नंदनवन.

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

धीराचे धारिष्ट्य

मनी दाटता झाकोळ,
चिंता घाले झिम्मा गोल.
प्रश्न जगण्याचा खोल,
कसा सुटे?

अघटित घडे सदा,
मनामध्ये सदा द्विधा.
चिंता उडवते त्रेधा,
दिनरात.

वाटे फाटले आभाळ,
परिस्थितीचा अवकाळ.
सुटे जीवनाचा ताळ,
हातातून.

मन घट्ट होत जाई,
धीर धरूनच राही.
लत्ताप्रहर हा होई,
दुःखावरी.

सोमवार, २ डिसेंबर, २०१९

स्पर्शाची जादू

व्यक्त होण्या शब्द जेव्हा,
तोकडे पडून जातात.
स्पर्शातून भावनेचे,
पूर वाहू लागतात.

गोंजारता तान्ह्याला,
टाहो त्याचा आवरे.
घट्ट बिलगता छातीशी मग,
दुःख सारे विसरे.

जिवलग खचता विवंचनेने,
शब्द धीराचे थिटे.
हात पाठीवर फिरता प्रेमे,
नवउमेद ही दाटे.

स्पर्शाची ही जादू बांधते,
मनामनाचे बंध.
भरते येई मनी सुखाचे,
उरे ना आक्रन्द.

रविवार, १ डिसेंबर, २०१९

ओढाताण

घड्याळाच्या काट्यामध्ये,
अडकले हे जीवन.
धावपळ करता करता,
सुख शोधी हे मन.

व्यक्त व्हायचे म्हटले तरी,
शब्द सुचणे अवघड.
म्हणून स्मायली-स्टिकर ची,
करावी लागे तडजोड.

विचार करून शब्द सुचण्या,
वेळ आहे कुणा.
उंदरांच्या शर्यतीत,
थांबणे हा गुन्हा.

स्पर्श हळू प्रेमाचाही,
मग परका होई.
ऊबेवाचून मायेच्या,
जीव झोपी जाई.

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...