रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

भाच्यांची आठवण

शांततेत सकाळ आज,
कल्ला नाही कुठला!
शशी समुचा मामा जरा,
चाचपडतच उठला!

नाही अस्ताव्यस्त अंथरूण,
नाही मामाचा घोष.
बोचणाऱ्या शांततेचा,
वाटे आज रोष.

डॉगीचे स्वैर धावणे,
आज हरवून बसले.
वात्सल्याचे हात माऊला,
कुठेच ना ते दिसले.

आज्जीचा गोंधळ होई,
काही हरवले आज.
पसाऱ्याचा घराला,
नाही उरला साज.

जुगलबंदी मामीसोबत,
कोण करणार आता?
रविवारची गम्मत न्यारी,
कोण मारणार बाता?

गुरुवार, ९ जुलै, २०२०

येशील का गं राधे?

अडकलोय मी कुठेतरी,
तुझ्या असण्यामध्ये.
माझे असणे मान्य करून,
येशील का गं राधे?

तडफडतोय मी कुठेतरी,
तुझ्या नसण्यामध्ये.
माझे प्राण धन्य करून,
येशील का गं राधे?

हरवतोय मी कुठेतरी,
तुझ्या आठवामध्ये.
माझे अर्घ्य दान घेऊन,
येशील का गं राधे?

संपतोय मी कुठेतरी,
तुझ्या आभासामध्ये.
माझा श्वास परत घेऊन,
येशील का गं राधे?

शनिवार, ४ जुलै, २०२०

बाईविना घर

वेळ तुझ्या जाण्याची,
जवळ येत जाते.
का कसे माहीत नाही,
चुटपुट लागत राहते.

एकटा जीव सदाशिव,
मी तसा ही असतो.
घराचा उंबरठा,
का बरे रुसतो?

घरातली कामे होतील,
तू नसली तरी.
सहजता कशी येणार,
जीव फुंकणारी?

कण कण घराचा,
बाईभोवती फिरे.
बाईविना घरामध्ये,
चैतन्य ना उरे.

गुरुवार, १४ मे, २०२०

उन्हाळी सुख

उन्हाळ्याचा ताप,
वाटे मोठा जीवा.
उकाड्याचा कहर,
गरम नुसती हवा.

अंघोळ करतानाही,
घामाच्या धारा हजार.
पाणी कमी, घाम जास्त,
पुसून पुसून बेजार.

पंखा जोरात फिरे,
ऐकू कमी येई.
दिवसभराच्या वादाची,
चांगली सोय होई.

जेवून पोटभर छान,
ताणून द्यावी मस्त.
अख्ख्या उन्हाळ्याची,
एवढीच गोष्ट बेस्ट.

बुधवार, १३ मे, २०२०

व्याप

वेळेचे बंधन,
मानले तर आहे.
कामात आयुष्य,
बुडून राहे.

चक्र कामाचे,
गमतीचे असे.
कायमचे भोवती,
पडती फासे.

गणित कामाचे,
व्यस्त जाता.
आवेग व्यापाचा,
कोणा सांगता?

व्यापही आपला,
तापही आपले.
कष्टाचे फळ,
आपणच चाखले.

मंगळवार, १२ मे, २०२०

चारा

कोवळ्या उन्हात चमके,
धरा तजेली छान.
झुळूक वाऱ्याची हळू,
फुंकी अलगद प्राण.

चिवचिव करती पक्षी,
हळूच कोठेतरी.
झुलत बसती सारे,
एखाद्या फांदीवरी.

हालचालीत त्यांच्या,
लगबग थोडी दिसे.
चारा शोधण्या डोळे,
फिरती वेडेपिसे.

दिसता चारा कोठे,
झुंबड त्यांची उडे.
कलबलाट तो मोठा,
गोंधळ मोठा उडे.

सोमवार, ११ मे, २०२०

मरणाचे दान

कष्टकरी माझा,
रोज मरतो.
अनवाणी जगी,
तो फिरतो.

आस गावाची,
तो धरतो.
वारं पीत, ऊन खात,
भूक मारतो.

हेटाळणी तिरस्कार,
तो भोगतो.
काही न मागता,
दिनरात जागतो.

थकून भागून,
तो झोपतो.
झोपेत मरणाचे,
दान लाभतो.

रविवार, १० मे, २०२०

माय

माय अवकाश माझे,
माय अविरत झरा.
माय पंखातले बळ,
माय चोचीतला चारा.

माय दुःखातला धीर,
माय मनातला ठसा.
माय स्तन्य जीवनाचे,
माय प्रेमकवडसा.

माय उदरात ऊब,
माय स्पर्श हलकासा.
माय हात पाठीवर,
माय आसरा हवासा.

माय वरदान मोठे.
माय वर्षाव प्रेमाचा.
माय थंडगार छाया,
माय उद्धार जन्माचा.

शनिवार, ९ मे, २०२०

लढावेस तू स्वैर

जपणार नाही तुला,
तळहाताच्या फोडासारखे.
लढायचे आहे तुला,
अभेद्य मोठ्या गडासारखे.

गोंजारून होशील तू,
मिळमिळीत लोणी जैसा.
खंबीर व्हायला हवेसे,
टणक कातळी खडक जैसा.

बावनकशी सोनं नसलास,
तरी हरकत नाही.
पोलादी तुझे मन व्हावे,
तत्वांशी फारकत नाही.

लढावेस तू स्वैर,
घोंघावणारे वादळ होऊन.
टाकावीस कैक संकटे,
घोटासवे सर्व पिऊन.

शुक्रवार, ८ मे, २०२०

गाणे

गाण्यामुळे शांत,
होऊन जाते मन.
सुरावटींवर स्वार,
होती कित्येक क्षण.

गाण्यामुळे ताल,
सापडू लागे हळू.
ठेक्यावरती तन,
थिरकू लागे हळू.

भावना असती,
ओतप्रोत गाण्यात.
व्यक्त होण्या वाव,
मजा येई जिण्यात.

ताल-सूर लेवून,
शब्द वाटती छान.
मिटावे हळू डोळे,
द्यावी मोठी तान.

गुरुवार, ७ मे, २०२०

मुका जीव

आजकाल पक्षी,
अंगणी माझ्या येती.
किलबिलाट करून,
नवचैतन्य जागवती.

दिवस उजाडता होई,
सुरू त्यांचा कालवा.
जाग येई सहजच,
आळस आता मालवा.

वळचणीला आडोसा,
पक्षी शोधत राहती.
खुडबुड करून कधी,
जरा अंत पाहती.

त्रास झाला थोडा तरी,
संग चांगला आहे.
मुक्कामाला मुका जीव,
हक्काने येऊन राहे.

बुधवार, ६ मे, २०२०

टाळेबंदी

झोपेचे ओझे,
पापण्यांवर वसते.
टाळेबंदीत आयुष्य,
आळसात फसते.

वेळकाळाचे गणित,
कोण कशाला मांडते.
स्थूल झाले शरीर,
चरबी ओसंडते.

आपणच आरशामध्ये,
हनुवटी बघावी ओढून.
वाढलेल्या वजनाला,
बघावे जरा ताडून.

ताळेबंदीचे चक्र,
किती दिवस चालणार?
जनता आता किती,
आळसात लोळणार?

मंगळवार, ५ मे, २०२०

शब्दभूषण

यमक जुळवून केलेली,
कविता सरकत नाही.
तशी माझी शब्दांशी,
खरंच फारकत नाही.

इतरवेळी शब्द,
भोवती घालती पिंगा.
ओघवत्या कवितेला,
हळूच दाखवी इंगा.

शब्दपोतडी धुंडाळून,
शब्द गावत नाही.
सख्खे शब्द कधीकधी,
सहज लाभत नाही.

अलगद एखादा शब्द,
स्मित हास्य दावी.
कविता पूर्ण होऊन,
शब्दभूषण लावी.

सोमवार, ४ मे, २०२०

एकटे जग

आपण म्हणतो कधी,
जग वाटते शांत.
किलबिलाट मनांमध्ये,
विचार आणि भ्रांत.

शांततेच्या पोटी,
अशांतता वसते.
दुःख उरी बाळगून,
जग खोटे हसते.

आकाशातला चंद्र,
एकटा झुरत पडे.
जग बिचारे विवंचनेत,
नजर शून्यात जडे.

वारा आताशा जरा,
रेंगाळत बसतो.
पंख्याखालील जगाला,
एकटा हसत बसतो.

रविवार, ३ मे, २०२०

कात

नवीन विचार करता,
वाटते नवीन काही.
काय करावे नवे,
कशाला म्हणावे नाही.

चौकटीच्या बाहेर,
जग असते मोठे.
जगाच्या चौकटीतून,
माझे जग छोटे.

अल्याडपल्याड कधी,
भूमिका बदलून पाहू.
नव्या जगाच्या भेटीला,
अवचित येत राहू.

बदल म्हणून बदल,
छान वाटे तसा.
कात टाके चपळ,
साप वाटे जसा.

शनिवार, २ मे, २०२०

येड्यांची जत्रा

येड्यांच्या जत्रेचे,
सोंग असे भारी.
सारखीच तऱ्हा,
घरी आणि दारी.

सरळ भाषेचा वापर,
इथे गौण ठरतो.
कडक शब्दांचा मार,
ताण कमी करतो.

किती सांगा, कसे सांगा,
फरक पडे शून्य.
एरंडाच्या गुऱ्हाळाणे,
येते औदासिन्य.

अकलेचा अभाव येथे,
तर्कशास्त्र फिके.
तेच तेच सांगून,
आयुष्य ओकेबोके.

शुक्रवार, १ मे, २०२०

सौख्याचा संसार

संसाराची गाठ,
रेशमीच असते नेहमी.
कसे हाताळता तुम्ही,
त्यावर ठरते हमी.

आहे तसे मान्य,
करून चालले पाहिजे.
गुणांसोबत दोष,
प्रेमाने जपले पाहिजे.

प्रत्येक क्षणी कसोटी,
लागते येथे तुमची.
बर्फ डोकी, मुखी साखर,
ठेवावी कायमची.

हातात हात गुंफून,
नांदावे प्रेमाने.
क्षण वाटून घ्यावे,
संसारी सौख्याने.

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

खर्डेघाशी

खर्डेघाशी करून,
जीव आंबून जातो.
त्याच त्याच जगण्याचा,
खूप कंटाळा येतो.

काम बदलून बदलून,
किती बदलत जाणार.
कधीतरी त्याला,
तोच तोचपणा येणार.

दिवस उडून जातील,
वर्षे संपून जातील.
चक्रामध्ये फिरता फिरता,
क्षण विरून जातील.

सगळी कामे संपतील,
पण एक काम राहील.
जगण्याच्या या पसाऱ्यात,
जगायचेच राहील.

बुधवार, २९ एप्रिल, २०२०

आयुष्याचे लोणी

तोंड घालणारी माणसे,
वा तोंड घालणारे मांजर.
हेकेखोर स्वभावाला,
कोण घालणार आवर.

आयुष्याचे शिंकाळे,
लोंबतच राहाते.
बोक्यांचे लक्ष त्याच्या,
लोण्यावर राहाते.

संधी मिळताच झडप,
तुटून पडतात बोकी.
उलथेपालथे आयुष्य,
येतात नऊ नाकी.

झडपेपासून सावरण्यातच,
खर्ची आयुष्य होते.
आयुष्याच्या लोण्याचे,
स्वाद घेणे राहाते.

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

गाडलेली भुते

आळशी एक विचार,
जांभई देत उठला.
नको त्या गोष्टीचा,
किस पाडत बसला

भंडावून सोडले,
शांत निरव मन.
जणू हिरव्या रानी,
तुडवत गेला तण.

हलकल्लोळ कसला,
अचानक मजला.
अचंबित वातावरण,
गोंधळ कसला?

गाडलेली भुते,
जमिनीतच बरी.
उकरून काढता त्यांना,
त्रेधा उडते खरी.

सोमवार, २७ एप्रिल, २०२०

सैर आठवणींची

किती निरव शांतता,
किती स्थिर वेळ.
एका जागी नीट बसता,
विचारांचा मेळ.

शांत बसून आठवावे,
आनंदाचे क्षण.
खट्टू नाही होणार,
आळसावलेले मन.

अलगद उलगडावे,
पदर आठवांचे.
पुन्हा चकाकतील,
रंग भावनांचे.

आभासी का होईना,
मौज येईल मोठी.
आठवणींच्या राज्यात,
सैर होईल छोटी.

रविवार, २६ एप्रिल, २०२०

अडलेले क्षण

थकलेल्या तुझ्या जीवाचे,
हाल बघवत नाही.
ओझे जीवाला जीवाचे,
त्रास संपत नाही.

त्रासलेल्या तुझ्या मनाचे,
रुंदन आवरत नाही.
चिंता जीवाला जीवाची,
लागणे थांबत नाही.

सुजलेल्या तुझ्या पायांचे,
दुखणे थांबत नाही.
करुणा जीवाला जीवाची,
वाटणे राहावत नाही.

अडलेल्या तुझ्या क्षणांचे,
अडखळणे लपत नाही.
विचार जीवाला जीवाचे,
सुचणे संपत नाही.

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

माज कशाचा?

तऱ्हेवाईकपणाचे,
कोडे तुझे मोठे.
चुका करुनि भाव खाशी,
मोठेपण खोटे.

अडेलतट्टू भूमिकेतून,
ताण वाढवीत जाशी.
सहजच येशी जमिनीवर,
पडता तू तोंडघशी.

माज कशाचा तुज एवढा,
प्रश्न सदा मज पडे.
आक्रस्ताळे वागूनी शेवटी,
व्हायचेच ते घडे.

तोटा होई तुजला मोठा,
माती तव मानाची.
चुकांतूनी तू काय शिकशी,
इच्छा ना तुज त्याची.

शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

वाट त्याची पाही

माखलेले शील तुझे,
भोवताली पाही.
प्रारब्धाचे भोग तुझे,
वाट त्याची पाही.

वाकडे पाऊल तुझे,
भोवताली पाही.
अभागी भाग्य तुझे,
वाट त्याची पाही.

वस्तुनिष्ठ प्रेम तुझे,
भोवताली पाही.
एकटे भविष्य तुझे,
वाट त्याची पाही.

डावपेच खेळ तुझे,
भोवताली पाही.
उलटणारे फासे तुझे,
वाट त्याची पाही.

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

मूकपणे रडतो

चुरडलेला पाचोळा मी,
तुझ्या सवे उडतो.
पायदळी तुडवून सुद्धा,
मूकपणे रडतो.

वठलेले खोड मी,
एकटा सदा पडतो.
छाटला जाऊन सुद्धा,
मूकपणे रडतो.

गावलेला मासा मी,
एकटा तडफडतो.
फसवला जाऊन सुद्धा,
मूकपणे रडतो.

अडकलेला श्वास मी,
मरणा संगे भिडतो.
कोंडला जाऊन सुद्धा,
मूकपणे रडतो.

बुधवार, २२ एप्रिल, २०२०

विषारी प्रेम

किंमत माझ्या प्रेमाची,
बोललो नाही.
तुझ्या उथळ प्रेमात,
तोललो नाही.

गोडी माझ्या प्रेमाची,
चाखलो नाही.
तुझ्या कडवट प्रेमात,
ओकलो नाही.

रंग माझ्या प्रेमाचे,
पांघरलो नाही.
तुझ्या बेरंगी प्रेमात,
गांगरलो नाही.

अमृत माझ्या प्रेमाचे,
प्यायलो नाही.
तुझ्या विषारी प्रेमात,
राह्यलो नाही.

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

अंतरीचे सूर

अंतरीचे सूर माझ्या,
कधी थेट हे लागती.
शब्द आठव दावती,
घटनांचे.

विस्मयकारक होती,
अर्थ नव्याने लागती.
कशी हरवली नाती,
जवळची.

तिढे सुटण्या लागती,
मनी हिशोब मांडती.
काय उरणार हाती,
वजा जाता.

बाजू सर्वांच्या पटती,
तरी वारे घोंगावती.
स्वभावाने होते माती,
उद्धटांच्या.

सोमवार, २० एप्रिल, २०२०

सत्य

सत्य असे कालातीत,
सत्य परिस्थितीजन्य.
सत्यशोधाचे हे पुण्य,
कोणा मिळे?

सत्य बारीकशी रेती,
हाती सहज ना येती.
शर्थ करावी लागते,
प्रयत्नांची.

सत्य धक्का देई कधी,
भयचकितच होई.
डोळा अंधारी ही येई,
ऐकून ते.

सत्य वैश्विक रूपाने,
खोल खोल होत जाणे.
गुंतती तयात मने,
कैक येथे.

रविवार, १९ एप्रिल, २०२०

तुझ्यासोबत असताना

तुझ्यासोबत असताना,
क्षण उडून जातात.
प्रेमाच्या मधामध्ये,
ओठ बुडून जातात.

तुझ्यासोबत असताना,
सप्तरंग दिसतात.
घरातल्या कुंडीतली,
पानेफुले हसतात.

तुझ्यासोबत असताना,
वारा होतो धुंद.
कातरवेळी खुणावे
नभी तारा मंद.

तुझ्यासोबत असताना,
दिवे मालवून जातात.
निशेच्या उदरात,
क्षण सुगंधी होतात.

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

रडगाणे

रोजचेच रडगाणे,
रोजचेच मढे.
व्यापाचा सूर्य कसा,
डोईवरी चढे.

तोचतोचपणा असे,
तेचतेच वागणे.
नाविन्याचा वास नाही,
कुबट कुबट जगणे.

दिवस मोजत ढकलावा,
गोळाबेरीज मांडत.
हिशोबाला अंत नाही,
नाही दौत सांडत.

दुरून डोंगर साजिरे,
ज्याचे त्याचे जगणे.
मातीच्याच चुलीवरी,
मातीची भाकर थापणे.

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

उलटणारी रात्र

संथ झालीये रात्र,
निपचित पडलाय वारा.
उकाड्याने हैराण जग,
पंख्याचा कोंदट वारा.

खाल्लेलं पचतंय आता,
पोटामध्ये हळू.
दिवसभर हुंदडणारे मन,
निपचित पडले वळू.

अर्धोन्मेलित पापण्यांना,
झोप लागली येऊ.
हळूच चावणाऱ्या डासांचा,
जीव कसा घेऊ?

ह्या रात्रीच्या पाठोपाठ,
चालू पान उलटेल.
ताज्यातवाण्या दिवसासंगे,
नवे पान भेटेल.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

मी व्हावे गुलाब

मी व्हावे गुलाब,
इवल्याश्या कुंडीतले.
क्षण जगावे वाऱ्यासावे,
सुगंधी धुंदीतले.

उष्णतेने लाही लाही,
माझ्या मातीची होईल.
झुळूक अलगद वाऱ्याची,
सुख देऊन जाईल.

तृप्त होईल मन,
रतीब पाण्याचा होता.
आनंद येईल उधाण,
खत मातीत मुरता.

शुष्क होताना पाकळ्या,
मी निस्तेज होईल.
गळणाऱ्या पाकळ्यांसवे,
विस्मृतीत जाईल.

बुधवार, १५ एप्रिल, २०२०

काट्याचा हेवा

विचारांचे मळभ,
दाट होत जाई.
अंधाराच्या आडून,
मन चिरकत राही.

अनिश्चित काळ,
किती दिवस चालणार.
स्थिर झाले जग,
जागचे कधी हलणार.

बसून बसून नुसते,
वेळ खायला उठतो.
उर्मी किती टिकणार,
निराशेला गाठतो.

अलगद वळवून मन,
घड्याळ बघत बसतो.
पळणाऱ्या सेकंद काट्याचा,
हेवा वाटत राहतो.

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

निद्रानाशाचा विळखा

निद्रानाशाचा विळखा,
होत जाई गडद.
चिंता पांघरून मन,
बसे सदा कुढत.

भूतकाळातील धक्के,
डोके वर काढती.
वेळकाळाचे भान कसले,
तास उडून जाती.

मन रवंथ करत बसे,
तेच जुने प्रसंग.
पुन्हा होती तेच क्लेश,
गडद होती रंग.

घोरत पडे जग सारे,
मी टक्क जागा.
कसे थांबवू विचार,
कसा थांबवू त्रागा?

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

अपेक्षेपोटी प्रेम

अपेक्षेपोटी प्रेम,
अळवावरचे पाणी.
किती कसे सावरणे,
असते अजब कहाणी.

नात्यांच्या ह्या गुंत्यात,
जीव अडकून राही.
भाबड्याला त्या वाटे,
दुःख कशाचे नाही.

अलगद फेरा फिरतो,
आभासी नात्यांचा.
उसळी मारे दुःख,
चुरा पडे प्रेमाचा.

खरेखुरे ते प्रेम,
ओळखायला हवे.
लाभे ना सर्वांना,
हे मानायला हवे.

रविवार, १२ एप्रिल, २०२०

नाविण्याशी सुत

कैक दिसांनी कुंडीमधले,
रोप माझे बहरले.
फुलफुलांच्या गुच्छाने,
रोप माझे डंवरले.

दिसांमागुनी दिवस जाहले,
कळी उमलली ना कधी.
वाढ खुंटली, कोंब कुठले,
फांदी फुलली ना कधी.

रतीब वाढता पाण्याचा,
जोड खताची मग मिळे.
खुराक तो नेमका लाभता,
तरारूनी फुटती मुळे.

कलाटणी ही मिळता रोपा,
ओकेबोकेपणा गळे.
चैतन्याची नांदी येई,
नाविण्याशी सुत जुळे.

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

साधू संधी

कोरोनाचा बंदीवास,
समजतो मी संधी.
करा नवी सुरुवात,
बना थोडे छंदी.

अडगळीत पडलेली,
पुस्तके काढा हळू.
एकदा वाचनात बुडाले,
की धावेल वेळेचे वळू.

वाद्य हौशेने घेतलेले,
साफसूफ करून घ्या.
घरच्यांना घरगुती,
संगीत मैफिल द्या.

एवढा फावला वेळ,
पुन्हा भेटेल काय?
आत्मचिंतनात बुडायला,
एकांत मिळेल काय?

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

एकटा बंदिस्त मी

कोंडलेल्या घरामध्ये,
कोंडलेल्या चौकटी.
दिवस असू दे वा रात्र,
मीच माझी सोंगटी.

दिशा असल्या मोकळ्या,
परि भिंतीने त्या आखल्या.
काय होई मग पुढे,
ह्या चिंतेने त्या माखल्या.

जीवनाची निश्चिती ना,
भविष्याची मज हमी.
जग इथे हे थांबलेले,
धावे पूर्वी नेहमी.

अनिश्चिताचा काळ हा,
वेळ पडतो ना कमी.
कुंपणात बांधलेला,
एकटा बंदिस्त मी.

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

माझे प्रेम असे जणू

माझे प्रेम असे जणू,
कोसळता पावसाळा.
तुला संतत प्रेमाचा,
उपजत असे लळा.

माझे प्रेम असे जणू,
उचंबळणारी लाट.
तुझ्या मनी शांत किनारा,
आवडे नाजूक लाट.

माझे प्रेम असे जणू,
वादळी सोसो वारा.
तुझे मन नाजूक वेल,
झुळुकीशी संग न्यारा.

माझे प्रेम असे जणू,
पर्वते ज्वालामुखीची.
तुझ्या मनी कातरवेळ,
ओढ तया टेकडीची.

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

रुंदन

भूतकाळाच्या सावल्या,
भूत होऊन फिरतात.
भविष्याचे धागे,
गुंफण्या आधीच विरतात.

कडकडाट करत,
वीज भेदून जाते.
स्वप्नाळू हे मन,
रुंदन मुके गाते.

निद्रानाश होतो,
आयुष्याचा भाग.
प्रातःकाळी कसली,
येई भाग्या जाग.

भुलभुलैय्या ऐसा,
वाढत वाढत जातो.
रक्ताळल्या हृदयामधुनी,
जीवनगीत गातो.

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

भरारी

माझी शकले उडली,
हाळी उठली गावी.
लटांबरे उलथली,
पाहण्या मौज नवी.

कुत्सित हास्यकटाक्ष,
खोटे अश्रू डोळी.
वरवरची विचारणा,
दुःख कशाचे पाळी.

औलादी गिधाडांच्या,
लचके मजेने तोडी.
करकचूनी हे पाश,
मज एकटा सोडी.

परि त्यांसी न ठावे,
शकले माझी असती.
सृजन धर्म हा माझा,
फिनिक्स माझ्यात वसती.

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

तासखेडा गाव

आज आठवे मजला,
मित्राचे ते गाव.
कच्च्या वाटेने गवसे,
त्याचा अलगद ठाव.

घरे इटूकली असती,
टप्प्याटप्प्यावरती.
शेतांमधुनी दिसते,
काळी आई धरती.

बागा केळीच्या तिथे,
दुतर्फा पसरलेल्या.
गावकऱ्यांच्या प्रेमामध्ये,
कडक ऊन त्या विसरल्या.

कडेकडेने वाहे,
नदी भरून दुथडी.
दृश्य वेड लावते हे,
गावी तया तासखेडी.

रविवार, ५ एप्रिल, २०२०

चिंतातुर मन

प्रश्न मारावेत फाट्यावर,
उत्तरे शोधावेत सडकून.
आयुष्याच्या व्यापामध्ये,
जाऊ नये अडकून.

रहाटगाडगे जगण्याचे,
गोलगोलच फिरणार.
उठसुठ धावलो तरी,
आपण किती पुरणार?

होईल तेवढे करत राहावे,
मनापासून आपण.
अपेक्षा ह्या अनंत असती,
कुठवर करणार आपण?

जगण्याचा आनंद असावा,
न्यूनगंड हा कशाला?
क्षणोक्षणी जल्लोष असावा,
चिंतातुर मन कशाला?

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

नवा दिवस

दिवसभर आळसावूनही,
झोप होत नाही.
झोपेतून उठले तरी,
पापणी उघडत नाही.

उठता झोपेतून होई,
जांभयांचा उद्रेक.
डोळे चोळून बेजार,
येई पाणी ही क्षणिक.

आठवत राहती स्वप्ने,
रात्रभर पडलेली.
तर्क कसले लागू,
विचारांची खांडोळी.

तळहातांनी चेहरा चोळून,
आळस झटका जरा.
आळोखे पिळोखे देऊन,
दिवसाची सुरुवात करा.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

व्यायाम

शारीरिक कसरतीचा,
फायदा मोठा भारी.
अंग होते मोकळे सगळे,
व्याधी होतात बरी.

दिवसभर बसून बसून,
अंग जाते आकसून.
व्यायामाने अंग झटकता,
आळस जातो निघून.

घमेजलेल्या शरीराचा,
गंध मजेशीर येतो.
शारीरिक कष्टाचे तो,
महत्व सांगून जातो.

निरोगी असावे आयुष्य,
व्यायाम असावा पाया.
निरोगी मन, निरोगी तनी,
आनंद जीवनी याया.

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

वेळेचा कुबेर

गरगर फिरणारा पंखा,
बाहेर किलबिलाट.
बंदीवासामधील जगाचे,
अस्तित्व ह्या खुणांत.

क्वचित येई आवाज,
धावणाऱ्या गाडीचा.
थोडासा भंग होई,
बोजड ह्या शांततेचा.

घड्याळाची टकटक,
स्पष्ट ऐकू येई.
स्थळकाळाचे भान,
सहज जाणवून जाई.

स्थूल ऐशा शांततेसम,
मन स्थूल होई.
वेळेचा मी कुबेर,
नसे कसली घाई.

बुधवार, १ एप्रिल, २०२०

एप्रिल फुल नको!

एप्रिल फुल करू नका,
प्रसंग आहे बाका.
जनाची नाही तरी,
मनाची तरी राखा.

दिवसाढवळ्या हजारो,
माणसे मरती जगभर.
विचार करा गोंधळ होईल,
फाजिलपणा क्षणभर.

कोरोनाचे संकट आता,
होत आहे मोठे.
वायफळ संदेश करतील घोळ,
असो कितीही छोटे.

समाजमाध्यम शस्र आहे,
वापर झाल्यास योग्य.
गळा आपल्याच लागेल पाते,
हेतू असता अयोग्य.

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

पेच

अंतिम सत्य हेच आहे,
तुझ्या माझ्यात पेच आहे.
शब्दशब्दांची ठेच आहे,
नवे नव्हे, हे तेच आहे.

काजळी मनावर दाट आहे,
आता चुकलेली वाट आहे.
प्रश्नांची मोठी लाट आहे,
का घातलेला घाट आहे?

विसंवादा फुटले तोंड आहे,
मौनास काटेरी बोंड आहे.
स्वखुशी गळ्यामध्ये धोंड आहे,
उधळले नशिबाचे खोंड आहे.

वादाला मौनाचा मंत्र आहे,
नाते टिकविण्याचे तंत्र आहे.
बेबंद मोठे षडयंत्र आहे,
दक्ष राहा हा मनमंत्र आहे.

सोमवार, ३० मार्च, २०२०

लढा कोरोनाशी

जळी, स्थळी पाषाणी,
कोरोनाची भीती.
हात लावू तिथे,
संसर्गाची भीती.

प्रत्येकाच्या मुखी,
कोरोनाची चर्चा.
घरामध्ये राहणे,
हाच उपाय घरचा.

तब्येतीची काळजी,
घ्यायला हवी आता.
मृत्यू आलाय दारी,
नको मोठ्या बाता.

एकजूट सर्वांची,
आता कसर नको.
दक्ष राहावे सर्वांनी,
गाफीलपणा नको.

रविवार, २९ मार्च, २०२०

अर्थमंदीची नांदी

रोगराईच्या पाठोपाठ,
आर्थिक संकट येणार.
जीव वाचवल्यानंतर,
प्रश्न आयुष्याचा होणार.

बोजा साऱ्या कर्जांचा,
अवजड होऊन जाणार.
काजू बदाम खाणारा,
आता शेंगदाणे खाणार.

नव्याने कंबर कसून,
तजवीज करावी लागणार.
तोट्याचे कारण देऊन,
नोकऱ्या खूप जाणार.

विकासाचे अश्व आता,
मुटकळून बसणार.
हतबल होऊन परिस्थितीशी,
सगळे स्वतःशी हसणार.

शनिवार, २८ मार्च, २०२०

फावला वेळ

रिकामटेकडे बसल्या बसल्या,
काय काम कराल?
आडवे होऊन लोळाल की,
छंदांकडे वळाल?

रिमोट टीव्हीचा दाबत,
चॅनेल्स नुसते चाळाल.
की अडगळीतील पुस्तके,
पुन्हा एकदा चाळाल?

फोनवर गप्पा मारून,
वेळ वाया घालाल.
की निवांत एकटे बसून,
हितगुज स्वतःशी कराल?

बसून बसून उबग आला,
अशी तक्रार कराल.
की चालून आली संधी,
तिचे सोने तुम्ही कराल?

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

उपरती

रोगराईचा फेरा,
काही वर्षांनी येतो.
मानवाची गुर्मी,
सहज जिरवून जातो.

विज्ञानाच्या बाता,
विरून जातात हवेत.
अख्खी मानवजात विषाणू,
घेता हळूच कवेत.

राहणीमानाचा दर्जा,
घसरत चाललाय खरा.
जीवावर बेतता म्हणे,
व्याप आवरा जरा.

स्वनिर्मित फास,
आवळतोय गळ्याभोवती.
मुळावरती उठले जिणे,
कधी होणार उपरती?

गुरुवार, २६ मार्च, २०२०

आयुष्याचा झरा

फाडावेत कोष टराटरा,
आयुष्य अवगुंठीत करणारे.
संपवावेत प्रवास भराभरा,
आयुष्य कंटाळवाणे करणारे.

भेदावे लक्ष पटकन,
ताण मनाचा वाढवणारे.
झटकावे विचार झटकन,
वृत्ती संकुचित करणारे.

निर्णय घ्यावेत पटापटा,
दिशा आयुष्याची ठरवणारे.
हितगुज सांगावे चटाचटा,
मनाला आतून पोखरणारे.

वाढवावी आयुष्यात सळसळ,
होऊन चैतन्याचे वारे.
वाहावे आयुष्य खळखळ,
प्रसन्न जगाला करणारे.

बुधवार, २५ मार्च, २०२०

संवाद-कालवा

निवांत भेटलाय वेळ,
तर कुटुंबासोबत घालवा.
बंध सोडा मनाचे,
होऊ द्या संवाद-कालवा.

चिल्लेपिल्ले बसतील,
बैठे खेळ खेळत.
गप्पागोष्टी करतील,
शब्दास शब्द घोळत.

प्रेमी युगुल बसतील,
गुज मनीचे सांगत.
ओढ उचंबळत राहील,
बेत मिलनाचे आखत.

जेष्टनागरिक बसतील,
गालातल्या गालात हसत.
अहो सांगतील किस्से,
अगं तांदूळ निसत.

मंगळवार, २४ मार्च, २०२०

कोरोना

अवघडून बसलाय,
प्रत्येकजण घरात.
कोरोनाच्या धाकाने,
धडकी भरे उरात.

किड्यामुंग्यांसारखी,
माणसे मरती अनेक.
वैद्यकशास्त्र विचारग्रस्त,
उपचार चालू अनेक.

चिडीचूप सगळीकडे,
अस्फुट अशी वेदना.
कुणी केल्या चुका सांगा,
कुणी केला गुन्हा?

धडधड ऐकून आपली,
खुश होऊन हसणे.
इलाज नसता काही,
का खट्टू होऊन बसणे?

सोमवार, २३ मार्च, २०२०

थरथरणारी ओंजळ

भूतकाळात डोकावता,
जिणे साधे स्मरते.
तंत्रज्ञानाच्या महापुरात,
धावपळीला भरते.

टिकटिकणाऱ्या वेळेसंगे,
जिणे सारे सरते.
कालबाह्य होण्याला,
मन खरे घाबरते.

स्वैर पक्षी नभी पाहुनी,
मना येई भरते.
चौकटीतल्या आयुष्याचे,
कौतुक कसले बरं ते?

ओंजळभर आयुष्याला,
ओंजळच पुरते.
विलासाला बळी पडोनी,
ओंजळ ही थरथरते.

रविवार, २२ मार्च, २०२०

नव्याने दिसणे तुझे

डोळ्यात वसे माझ्या,
प्रतिबिंब तुझे.
पापणी मी मिटता,
रूप दिसे तुझे.

नश्वर श्वासात माझ्या,
प्राण फुंकले तुझे.
श्वास आत घेता,
धडधडणे ग तुझे.

सो सो वारा कानात,
सूर ऐकतो तुझे.
चाहूल तुझी लागता,
गाणे होई तुझे.

माझ्या प्रत्येक पावलात,
ठसे उमटती तुझे.
मागे वळून पाहता,
नव्याने दिसणे तुझे.

शनिवार, २१ मार्च, २०२०

जाणीव

तू गुरफटलेली,
भ्रमाच्या जाळ्यात.
जाण नाही तुला,
फसली गोतावळ्यात.

फसवे सुरुंग,
पायाखाली वसती.
तुज ना गंध,
ना त्यांची धास्ती.

मुखवटा घातलेली,
तुज वाटती प्रिय.
उच्छाद छुपा त्यांचा,
तुज ना संदेह.

वात पेटवून पळती,
हळूच रेशीमगाठींची.
मग होई धमाका,
तुज जाणीव ना त्याची.

शुक्रवार, २० मार्च, २०२०

रोगराईतले अर्थकारण

अर्थकारणाचे खेळ,
असती गमतीचे.
रोगराईची लाट तरीही,
महत्व पैशाचे.

सेवा-उत्पादनाचे,
काम चालू राहे.
कर्मचाऱ्यांची सुरक्षा,
टांगणीवरती राहे.

बंद राहती मुख्यालये,
पाश्चिमात्य देशांतली.
राबे इतरत्र कर्मचारी,
भ्रांत जीवाची कसली.

किड्यामुंग्यांगणिक लोक,
मरत आहेत इथे.
कंपन्यांचा मालक मात्र,
पैशांसाठी कुथे.

गुरुवार, १९ मार्च, २०२०

माणसे ही

आळसात लोळणारी,
अहंकारी माजलेली,
गुर्मीमध्ये बोलणारी,
माणसे ही.

फास प्रेमे फेकणारी,
ढोंगीपणा असणारी,
विष सदा ओकणारी,
माणसे ही.

पैशाला चटावलेली,
नाती लोंबकळलेली,
भौतिकास भाळलेली,
माणसे ही.

मानपाना ताठलेली,
लोणी टाळूचे ही गिळी,
वृत्ती नेहमीच काळी,
माणसे ही.

बुधवार, १८ मार्च, २०२०

कुणासाठी?

रोज उठावे,
भरभर आवरावे,
वेळेत पोहोचावे,
कुणासाठी?

कष्ट करावेत,
इच्छा माराव्यात,
पैसे साठवावेत,
कुणासाठी?

समजून वागावे,
समोर हसावे,
एकटे रडावे,
कुणासाठी?

व्याप वाढवावा,
ध्यास धरावा,
संयम पाळावा,
कुणासाठी?

मंगळवार, १७ मार्च, २०२०

का?

संवेदनांचा अस्त,
म्हणजे पोक्तपणा का?
दगड होऊन जगणं,
म्हणजे मोठेपणा का?

आतल्या आत कुढणं,
म्हणजे सोशिकपणा का?
गालात हसून रडणं,
म्हणजे हसमुख चेहरा का?

हिशोबी जिणे जगणं,
म्हणजे व्यवहारीपणा का?
मनात डावपेच रचणं,
म्हणजे मुत्सद्दीपणा का?

ताणतणावात जगणं,
म्हणजे व्यस्त असणे का?
कोशात अडकून राहणं,
म्हणजे मस्त जगणे का?

सोमवार, १६ मार्च, २०२०

रोगराई

रोगराईचा हैदोस,
उगाच होत नाही.
माणसाची हाव,
कधीच फिटत नाही.

खाण्यायोग्य खावे,
कसे कळत नाही.
अयोग्य खाण्याने,
काहीच मिळत नाही.

आहार चुकीचा घेता,
सांगड चुकीची होते.
यातून रोगराई,
आपसूक जन्म घेते.

बुद्धिमान मानवाची,
कसली ही दशा.
आपणच हाताने,
करून घेतला हशा.

रविवार, १५ मार्च, २०२०

सडका कांदा

नाकर्तेपणा मिरवणारे,
बरेच नग दिसतात.
पुढाकार नाही कशात,
हक्क बाकी कळतात.

शेपूट घाले जिणे यांचे,
भुईला हा भार.
भीक नको, कुत्रे आवर,
वाटे नेहमी फार.

अडून बोलणे यांचे असे,
धमक नाही थेट.
हित जाणावे पटकन यांना,
सोईनुसार खेट.

आयुष्यात बोंबा किती,
करती किती वांदा.
दूषित करती सर्वांना,
जणू सडका कांदा.

शनिवार, १४ मार्च, २०२०

आत्मभान

प्रवाही असावे जिणे,
एकच प्रवाह नको.
भान जगाचेही ठेवा,
आभासी जगणे नको.

आत्मकेंद्री जगल्यास,
शून्यच हाती लागती.
स्वार्थापोटी राखलेले,
बाण भात्यात गंजती.

भोवतालाचा अंदाज,
सूज्ञपणा वाढवतो.
माणसातून माणूस,
माणसापरि घडतो.

जया कळले गमक,
तोचि सदा सुखी होई.
झापडे लावून जगे,
त्याचा गाढवच होई.

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

विवेकाचा आधार

भुते जुनी डोकावती,
थैमान मनी घालती.
बुरुज कैक ढाळती,
विचारांचे.

सैरभैर वाटे कसे,
होई मन वेडेपिसे.
गुंतागुंतीचे हे फासे,
भावनांचे.

कसा थांबावा उद्रेक,
ओरखाडे हे अनेक.
मलमपट्टी क्षणिक,
कुचकामी.

विवेक जागा करुनी,
दुःख बाजूला सारूनी.
करावी मनधरणी,
स्वतःचीच.

गुरुवार, १२ मार्च, २०२०

कामाचा उरक

बोजा कामाचा वाढता,
डोके होई बंद.
रुचिशून्य कामाचा,
कैसा आला छंद.

काम संपवायची वेळ,
ठरली असली जरी.
रात्र थोडे सोंगे फार,
हीच अवस्था खरी.

मनासारखे ठरवून,
काम होत नाही.
अंदाज चुकता जरा,
चैन पडत नाही.

धाकधूकीत भरभर,
काम संपवायची घाई.
वाटे चढलो डोंगर,
पण चढली असे राई.

बुधवार, ११ मार्च, २०२०

तणावाचा सैतान

तणावाचा सैतान,
स्वस्थ बसत नाही.
मानगुटीवर बसता,
माणूस हसत नाही.

डोके त्याच्या ताब्यात,
जाते कळत नाही.
एकसारखा विचार करून,
तोडगा मिळत नाही.

वाटत राहते नेहमी,
काम करतोय भरपूर,
उरक कामाचा संथ,
जणू कामाचा महापूर.

उडून जाते झोप,
स्वप्नी व्याप दिसे.
शांत दिसते सर्व,
मनी खळबळ वसे.

मंगळवार, १० मार्च, २०२०

धावपळ

उबग कामाचा येणे,
साहजिक असते तसे.
धावणाऱ्या जीवाला,
धाप लागणे जसे.

अस्तित्व टिकवण्यासाठी,
धडपड करणे आहे.
पडत्या पावलागणिक,
स्वप्न नवे पाहे.

मोजमाप हुकता,
घोळ होतो खरा.
नेहमी वाटे गड्या,
जरा आरामच बरा.

विचार करण्यात वेळ,
आरामाची संपून जाई.
सुरू होई पुन्हा,
पळण्याची घाई.

सोमवार, ९ मार्च, २०२०

आस मिलनाची

तुझ्यातली तू मला,
म्हणावी तशी भेटत नाही.
संग तुझा असूनही,
आस मिलनाची सुटत नाही.

निरोप तुझा घेताना,
हात हलवणे पटत नाही.
राडा कामाचा आवरताना,
ढीग तसा रेटत नाही.

जेवलीस का हे विचारताना,
भूक मनाची मिटत नाही.
चहा एकट्याने घेताना,
चव प्रेमाची साठत नाही.

घराकडे येताना मग,
पळ पळाला खेटत नाही.
जिना भरभर चढताना तो,
ओढ भेटीची आटत नाही.

रविवार, ८ मार्च, २०२०

चाहूल

तुझ्यासाठी राबताना,
मना फुटे माझ्या पान्हा.
आस अतीव लागली,
घरी रांगणार कान्हा.

मग होईल पसारा,
आवरल्या बरोबर.
घर बोलके होईल,
रडणाऱ्या सुरावर.

खिदळणे, चेकाळणे,
खूप होईल दांगोडा.
सुचण्या ना अवकाश,
घरभर होई राडा.

मग दमून पेंगाळे,
निज येई डोळ्यांवर.
थोपटून खांद्यावर,
घाली मायेची पाखर.

शनिवार, ७ मार्च, २०२०

जीवनगाणे

म्हणा कोणतेही गाणे,
होई जीवन तराणे.
सूर आनंदे लागता,
कैसे शाब्दिक बहाणे.

व्यक्त व्हावे स्वतःसाठी,
सर्वांसाठी, जगासाठी.
अडखळणे कशाला,
कोणती ही आडकाठी.

देणे निसर्गाचे थोर,
मन मोकळे होतसे.
शब्दागणिक भावना,
पाझरून वाहातसे.

कोंडमारा कशाला हा,
बंदीवास कशासाठी.
क्षण मुक्त उपभोगा,
गाणे जीवनाचे ओठी.

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

सोनचाफा

पिवळट पांढरट,
ऐसी नाजूक पाकळी.
तू तो चाफा, मी ग देठ,
तमा उन्हाची कसली.

अलगद परि छेडे,
तुज अवखळ वारा.
थरारून जाता तू गं,
चढे रागाचा हा पारा.

तुझा सुगंध घालतो,
पिंगा माझिया भोवती.
सुखी होई जीव माझा,
व्हावे तुझाच सांगाती.

कोमेजून तू गं जाता,
जीव होई कासावीस.
कैसी लागली नजर,
तुझ्या माझिया प्रीतीस.

गुरुवार, ५ मार्च, २०२०

दृष्टी आड सृष्टी

उलथापालथ आयुष्यात,
चालूच असते नेहमी.
ठरवले ते घडणार याची,
कोण देणार हमी?

वाळूचे महाल बांधू,
इच्छा असते मनात.
पत्त्यांचे बंगले बांधून,
कोसळतात क्षणात.

मनीषा वाटे झुळुकीची,
वारा वाहावा थंड.
पेल्यातले वादळ सुद्धा,
करू लागते बंड.

आराखडे बांधावे परि,
जीव न व्हावा कष्टी.
विसर नको कधी म्हणीचा,
दृष्टी आड सृष्टी.

बुधवार, ४ मार्च, २०२०

स्व-शुश्रूषा

पहावा अनाथ कोणी,
पोरकेपणा वाटता.
बोलावे मोकळे घरी,
एकटेपणा वाटता.

पहावा खिळला कोणी,
आजार मोठा वाटता.
तन मन स्वच्छ ठेवा,
अस्वस्थ जरा वाटता.

पहावा श्रमिक कोणी,
थकवा फार वाटता.
श्रम परिहार करा,
त्रास कष्टाचा वाटता.

पहावा दबला कोणी,
ओझे मोठाले वाटता.
स्वतः आनंदाने हसा,
बोजा वाढला वाटता.

मंगळवार, ३ मार्च, २०२०

जीवनाचे डबके

तोचतोचपणा देई,
जन्म नैराश्याला असा.
डबक्यात ढवळता,
गढूळपणा हा जसा.

लोप होई सृजनाचा,
चौकटीत राहूनिया.
क्षमता वाटती खुज्या,
कोशामध्ये राहूनिया.

नजर लागे शून्यात,
वैचारिक दैन्य येता.
बोजड वाटे हे जिणे,
सर्व पर्याय संपता.

टाळणे अशी अवस्था,
आपुल्या हातात आहे.
वाहणारे पाणी सदा,
स्वच्छ निर्मळ राहे.

सोमवार, २ मार्च, २०२०

नात्यांचे ठेकेदार

घात होतो नात्यांमध्ये,
ह्या ठेकेदारांपाई.
वाद संवादे मिटवा,
मध्यस्थीची का हो घाई?

गृहकलह म्हणजे,
संधी उत्तम काहींना.
उट्टे काढी अपमान,
भूतकाळातील गुन्हा.

दोघांमधले मतभेद,
तिसऱ्या कानी लागता.
वादळ पेल्यातले ते,
कैसे शमते शमविता.

तिलांजली द्यावी अहंला,
सुज्ञपणाचे लक्षण.
वेळ निघून गेली की,
होते नात्याचे भक्षण.

रविवार, १ मार्च, २०२०

भेटीगाठी

गाठीभेटी महत्वाच्या,
नाती ठेवायला ताजी.
कामाचा व्याप प्रत्येकाला,
भेटण्यास व्हावे राजी.

देवघेव सुखदुःखाची,
निचरा भावनांचा करे.
बैसुनी सोबत नातीगोती,
आठवणींना स्मरे.

हळूच हासू चेहऱ्यावरती,
स्मरताना क्षण खरे.
बैठक मग गप्पाटप्पांची,
कुणा कधी आवरे.

फेर धरावा नात्यांचा,
सवड काढूनी नक्की.
दीर्घायुषी मग सर्व रहाती,
भेट सुखाशी पक्की.

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

कुपीतले जीवन

धावा पळा, गाडी पकडा,
कसला मोठा व्याप.
क्षणाक्षणांनी जिणे सरते,
अजब जगण्याला शाप.

हाती लागेल तैसे जिणे,
पळता पळता घेतो.
सवड नाही परि श्वास घ्यावया,
ओंजळीस मी हुंगतो.

दृष्टीस दिसती सोहळे जितके,
पळता पळता टिपतो.
ताल पडता कानावर मग,
क्षणिकच मी थिरकतो.

जीवन वाटे अत्तर इवल्या,
कुपी मधले मजला.
दरवळात कधी रेंगाळावे,
पुन्हा भिडे व्यापाला.

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

मज कळते सर्वकाही

तू अवघडलेली प्रिये,
मज कळते सर्वकाही.
हालचाल वेगे नको,
मी आधाराला राही.

तू थकलेली प्रिये,
मज दिसते सर्वकाही.
कष्टाचा त्रागा नको,
मी मदतीला राही.

तू भांबावलेली प्रिये,
मज उमजे सर्वकाही.
चिंतेचा लवलेश नको,
मी संभाळण्या राही.

तू मंतरलेली प्रिये,
मज समजे सर्वकाही.
बागडण्या बंधन नको.
मी ठेका धरण्या राही.

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

टिळा माझ्या माथी सांगे

टिळा माझ्या माथी सांगे,
शांत ठेवावे मस्तक.
आवरता घे संताप,
होऊ नको तू हस्तक.

टिळा माझ्या माथी सांगे,
बांधिलकी देवासंगे.
होशी किती जरी मोठा,
जगावे तू भक्तीसंगे.

टिळा माझ्या माथी सांगे,
पोक्तपणाची कहाणी.
कुटूंब खरा आधार,
राब तया रात्रंदिनी.

टिळा माझ्या माथी सांगे,
जगण्याचे रे गुपित.
मनोभावे कर्म कर,
जरी असशी शापित.

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

व्हावे फुलपाखरू

जिणे असावे सदा,
फुलपाखराप्रमाणे.
हवे तसे बागडताना,
गावे जीवन गाणे.

कोष भेदावा अलगद,
सुरवंटाप्रमाणे.
आनंदावे स्वतःशीच,
मिळता पंख नव्याने.

भिरभिरावे फुलांवरती,
स्वैर जसे तराणे.
प्राशावेत मधूकुंभ,
तृप्त व्हावे उदराने.

कारण व्हावे आनंदाचे,
लक्ष वेधण्याने.
हळुवार पडावे कोसळून,
माती होऊन जाणे.

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

नोकरीची भाकरी

ऐसी कैसी ओढाताण,
धाव ऑफिसाला घेता.
रोजचीच पळापळ,
दोष तसा कुणा देता.

सूर्य उगवता धावे,
जीव कामाच्या ठिकाणी.
मावळून दिस निजे,
घरी जाण्या आस मनी.

नोकरशाहीचे भोग,
कुणी कशाला ऐकतो.
मासाअखेरी पगार,
सर्व जगाला खुपतो.

क्षेत्र निवडी सोबत,
त्याची बांधिलकी येते.
अडकल्यानंतर हे,
शहाणपण सुचते.

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

जगण्याची प्रश्नोत्तरे

तुमच्या विवंचनेला,
अर्थ नसतो खास.
प्रत्येकाच्या विवंचनेची,
केवढी मोठी रास.

कवटाळून दुःखाला,
मोठमोठ्याने रडाल.
प्रत्येकजण दबलेला,
कोणा गळी पडाल?

वर्तुळात जगता जगता,
वर्तुळ वाटे मोठे.
वर्तुळाकार ह्या जगात,
तुमचे वर्तुळ छोटे.

प्रश्न तुमचे आहेत,
उत्तरेही तुमची.
शोधता त्यांना शांततेत,
मिटे चिंता कायमची.

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

माझी राख

वेटोळा हा मज भवती,
तुझ्या स्वार्थाचा ग आहे.
कुंथुन माझे जगणे,
मरणाची वाट ग पाहे.

मज बोलायाची सोय,
ही परिस्थिती ना देते.
मम संतापाच्या आड,
भाग्य कुटुंबाचे येते.

तू धूमकेतू सारखी,
तू जळते जाळत जाय.
ही बेफिकिरी करू कशी,
जमिनीशी बांधले पाय.

मग जळतो मी अंतरी,
संतापाच्या ज्वाळेत.
तू तुडवत जशी पुढती,
मज माझ्याच राखेत.

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

पुरुषार्थाची हत्या

शरीराच्या जखमा दिसती,
मनाच्या दिसत नाहीत.
पुरुषाचे अस्फुट हुंदके,
जगाला कळत नाहीत.

पुरुषार्थाची होरपळ,
स्त्रीवाद्यांना कळत नाही.
सोईस्कर दुटप्पी वागणे,
पुरुषाला जमत नाही.

पितृसत्ता नावापुरती,
स्त्रीचे छुपे निखारे.
पाठीवर वार सदा हे,
पुरुषाला कोण तारे.

विद्रोही जरी विचार,
वास्तवात करपलेले.
स्त्रीवाद्यांच्या स्वार्थात,
पुरुष कैक हे मेले.

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

काव्यालाप

अडखळतो मी कधी कधी,
सुचत नाही कविता.
सुन्न होई डोके जेव्हा,
अति विचार करता.

आठवे माझा मी मग,
ती गर्दी विचारांची.
काव्यपंक्तीचा महापूर,
कोणती निवडायची.

आज वाटे मज बैचेन,
का रुसली माझी कविता.
चुटपुट लागे मनाला,
भावना कल्लोळ होता.

आळवता सूर विरहाचा,
मिटली मग माझी चिंता.
मम विरहगीतातूनच,
अवतरली माझी कविता.

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

आस दर्शनाची

मन प्रसन्न होते,
लवकर उठल्यानंतर.
मंतरल्यागत वाटते,
देव दर्शनानंतर.

धाव सकाळी घेते,
मन माझे मंदिरी.
नाद घंटेचा होई,
देवाच्या गाभारी.

हात जोडती आपसूक,
देव दर्शन होता.
तृप्ती मूर्तीच्या मुखी,
वाटे मी मज रिता.

श्रद्धा असता मनी,
तथ्य वाटे जगण्यात.
ओढ लागते देवा,
उगवता नवी प्रभात.

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

जन्मणारा बाप

चाहूल बाळाची लागता,
बाप जन्मत असतो.
कळतनकळत त्याच्यामध्ये,
बदल घडत असतो.

बाहेरून दिसतो खंबीर,
पण आतून चिंतीत असतो.
सर्व व्हावे व्यवस्थित,
हेच जपत असतो.

काटकसर आपसूक,
खर्चात करत असतो.
पैश्यापाण्याची सोय तसा,
बिनचूक करत असतो.

मोडून पडत नसला तरी,
धीर एकवटत असतो.
भल्याबुऱ्याचा विचार येता,
हळवा होत असतो.

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

निरोप गावाचा घेता

निरोप गावाचा घेता,
आवंढा गळ्यात येतो.
पूर मायेचा हा मोठा,
जीव पावली अडतो.

गाठीभेटींचा तो काळ,
जरी असे अल्पजीवी.
कोष स्नेहाचे गुंफूनी,
होती काळजात ठेवी.

दिनक्रमात बदल,
परिणाम मोठा करी.
पेंगुळल्या ह्या मनाला,
देई नवीन उभारी.

घटिका समीप येता,
निरोपाची पळासंगे.
गाव सोडताना मन,
घरामध्ये घाली पिंगे.

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

पंगत नात्यांची

करुनिया अन्नदान,
मना मिळे समाधान.
घास भुकेल्याच्या पोटी,
आशीर्वाद येई ओठी.

जग चाले पोटासाठी,
अन्न विवंचना मोठी.
भाजी भाकरीची गोडी,
असे कदापि न थोडी.

पंचपक्वान्न ना आस,
साधे अन्न वाटे खास.
प्रेमे वाढता ताटात,
तृप्ती लाभते पोटात.

गोतावळ्याची पंगत,
जेवणा येई रंगत.
समीकरण नात्यांचे,
मनामनामध्ये साचे.

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

गावाकडची धाव

धाव घेता गावाकडे,
जीव आनंदी होई.
मार्गक्रमण करताना,
चैतन्य दिसे ठाई.

भूतकाळात शिरून,
मन नाचू लागे.
उजळून जाती पुन्हा,
कैक रेशमी धागे.

आठवणी मग फेर,
गोल मनी धरती.
संस्मरणीय ते क्षण,
कैक मला स्मरती.

पाऊल पडता पहिले,
गावामध्ये माझे.
हसून स्वागत करती,
स्नेही जिवलग माझे.

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

चातक

गोफ तुझ्या नात्याचा,
अजून जुना आहे.
मैफिलीचा रंग गडे,
अजून सुना आहे.

ओठांचा लाल ठसा,
अजून ओला आहे.
आस तुझ्या चाहुलीची,
अजून डोळा आहे.

गंध तुझ्या चाहुलीचा,
अजून ताजा आहे.
मी अपुल्या स्वप्नात,
अजून राजा आहे.

माझ्या तळव्यावर तू,
अजून रेषा आहे.
पुन्हा तू येण्याची,
अजून अभिलाषा आहे.

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

विज्ञानाचे भान

विज्ञानाची कास धरुनी,
आयुष्य झाले सुकर.
स्वयंपाकाला गॅस,
भात लावायला कुकर.

प्रवास करणे झाले सोपे,
कैक वाहने आली.
ठिकाण असू दे कुठलेही,
धाव आवाक्यात आली.

संवादाची माध्यमे मोठी,
तर्जनी संगे नाचती.
जिवलग असू दे कोठेही,
भावना क्षणात पोहचती.

भान राहावे सदा सुखाचे,
विज्ञानाचे देणे.
ऊतमात नको परि सोयीचा,
लागतो तयाचे देणे.

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

आयुष्याचे प्रतल

संधी कुणावर डाफरायची,
सहसा कुणी सोडत नाही.
शब्दाने तुटतात मनं तरी,
सवय कुणी मोडत नाही.

संतापाच्या भरात वाटते,
कुणावाचून अडत नाही.
वाईट साईट प्रसंगामध्ये,
कुणी खरे रडत नाही.

जसा वाढतो अहंकार,
विवेकबुद्धी वाढत नाही.
पाय फसता फाटक्यामध्ये,
वर कोणी काढत नाही.

बंद पडले घड्याळ तरी,
काळ बंद पडत नाही.
आयुष्याच्या प्रतलावरची,
राखरांगोळी उडत नाही.

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

ग्लानी सुट्टीची

दिनक्रमाशी कट्टी घेता,
मन खुश असते.
दिनक्रमाशी गट्टी होता,
मन नाखूष असते.

सुट्टीच्या ह्या ग्लानीमध्ये,
मन अडकून राही.
सोनसाखळी आठवणींची,
असेच खेळत राही.

हसे स्वतःशी गालामध्ये,
आठवूनी गम्मत भारी.
बीज रुईचे होऊनी अलगद,
उडे हवेमध्ये स्वारी.

आठवणींतले अडकणे असले,
झटकुनी द्यावे लागे.
धाव घेऊनी पकडावे मग,
वास्तव रुपी धागे.

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

लाड स्वतःचे

ढगांची सर करायला,
धमाल मजा येते.
थोडावेळ का होईना,
मन गिरकी घेते.

उडते पक्षी होऊन,
वाऱ्यावरती सुसाट.
स्वतःलाच वाटतो,
राजेशाही थाट.

गळून पडते माझे,
सामान्य असणे.
नवल वाटे जरा,
नावीन्य असणे.

शक्य जरी नसला,
रोज हा थाटमाट.
गोंजारायला मन,
कधीतरी घाला घाट.

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

अंगमोडया प्रवास

अंग मोडून जाते जरा,
प्रवासात झोपल्यावर.
अंदाज येत नाही लवकर,
कुठे पोहोचल्यावर.

किलकिले करून डोळे,
द्यावी झोपेला सोडचिट्ठी.
अंग ताणून, जांभई देऊन,
करावी मोबाईलशी गट्टी.

कंटाळा आल्यावर मग,
नजर टाकावी बाहेर.
सोनेरी ऊन पडले छान,
मनाचा घराचा आहेर.

कधी एकदा संपतो प्रवास,
कपाळी आठी येई.
गरमागरम नाश्त्यासोबत,
चहाची आठवण येई.

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

प्रवास हवासा

प्रवासाची मौज वाटते,
बदल हवासा वाटे.
रडगाणे तर रोजच असते,
शांत जीवाला वाटे.

भेटती माणसे अनोळखी,
संवाद नवा हा वाटे.
व्याप रोजचा खुजा होऊनी,
बदल दृष्टीमध्ये दाटे.

गणित बदलते वेळेचे,
आवाका छानच वाटे.
घड्याळातले तास तेच,
अवकाश आवेशी वाटे.

जगण्याचे वर्तुळ गोल,
आकार वेगळा वाटे.
सपकपणाचा रंग मूळ,
नवे वलय भोवती दाटे.

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

जगण्याची उकल

क्षणाक्षणाचा बांधील,
जीव धावत राहतो.
लोपणाऱ्या क्षणासवे,
स्वप्न उद्याचे पाहतो.

सुखावून जातो कसा,
येता आनंदाचा वारा.
इच्छा नसताना देई,
कधी दुःखास हा थारा.

कलाटणी भेटे कधी,
सुरळीत आयुष्याला.
ओळखू न येई त्यास,
त्याचे रूप भुतकाळा.

जगणे असेच असे,
रंग क्षणांचे अनेक.
गोळाबेरीज जुळे ना,
उकल अगणिक.

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

छंद

ओरखडे मला काढणे,
छंद आहे तुझा.
मिरवावी ती बिरुदे,
छंद आहे माझा.

घायाळ मनाला करणे,
छंद आहे तुझा.
मन होई अश्वत्थामा,
छंद आहे माझा.

घोर जीवाला लावणे,
छंद आहे तुझा.
जीव निर्भीड करणे,
छंद आहे माझा.

प्रत्येक क्षणाला मारणे,
छंद आहे तुझा.
मरणात जगणं शोधणे,
छंद आहे माझा.

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

जिवलग माझे

गोफ सर्वांच्या आपुलकीचा,
भोवती असतो सदा.
आधार वाटे मोठा त्याचा,
उडता माझी त्रेधा.

माणूस म्हणून अडखळणार,
चुकणार केव्हा केव्हा.
सांभाळुनी मग प्रियजन घेती,
तोल जाणार जेव्हा.

सुख साजरे करायला,
सर्व सोबत असती.
खांदा दुःख सांगायला,
देती सगळी नाती.

ऋण सर्वांचे माझ्यावरती,
वाटे ना ते ओझे.
ऋणाईत मी या सर्वांचा,
सगळे जिवलग माझे.

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

जन्माचे सार्थक

जावे त्यांच्या मदतीला,
तेव्हा कळे.
एक सात्विक समाधान,
तेव्हा मिळे.

मेळ ताण तणावाचा,
तेव्हा जुळे.
खांदा दुःखी जिवा होण्या,
संधी मिळे.

मनुष्यजन्माचे सार्थक,
तेव्हा मिळे.
मुक्या जिवा घास देण्या,
बोट जुळे.

गमक ह्या जन्माचे गड्या,
तेव्हा कळे.
आशीर्वाद रुपी दान,
सदा मिळे.

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

सुप्रभात

सकाळी सकाळी,
उत्साहाचे दान.
पडे कोवळे ऊन,
ऊब त्याची छान.

हलके येई झुकूळ,
नसे सो सो वारा.
चेहऱ्यावरी हास्य,
त्राग्याचा पोबारा.

हळू द्यावी जांभई,
डोळे बारीक करून.
चहाचा घ्यावा अंदाज,
नाकानेच दुरून.

अमृततुल्य प्राशून,
मेंदू जागा होई.
दिनक्रमाचा पाढा,
घोकणे सुरू होई.

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

तत्वांची चिरफाड

आयुष्याच्या प्रश्नांची,
कधी होते चर्चा.
कन्हण्या-कुथण्यापुढे तसा,
कधी जातो मोर्चा.

आदर्शवादाचा चोथा,
किती दिवस चघळणार?
वास्तवावरचा मुलामा,
कधी बरं ओघळणार?

इथे आहे फारकत,
तत्व-वास्तवाची.
परिस्थिती कशी बदलणार,
पडा तोंडघशी.

प्रस्थापित राहण्या शाबूत हा,
घोळ केला आहे.
भरडणारा जीव बिचारा,
मरून जात आहे.

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

आनंदाचे मूळ

मीच माझ्या कष्टांची,
पांघरून झूल.
जगतोय का माझा मी,
विचारांची हूल.

ऊर फाटेस्तोवर पळतो,
तरी झालो स्थूल.
ओळखेना मला मी,
व्याधींचे संकुल.

आढयावेढ्यांचे हसणे,
कोमेजले फुल.
नियतीचे लक्तर की,
नाचणारे डूल.

गड्या आयुष्य एकदा,
करू नको धूळ.
आनंदाच्या झाडालाच,
आनंदाचे मूळ.

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

स्वतः

स्वतःशी हितगुज,
करायला हवे.
स्वतःचे मन,
हेरायला हवे.

स्वतःचे सुख,
भोगायला हवे.
स्वतःचे दुःख,
ढाळायला हवे.

स्वतःचे श्रम,
करायला हवे.
स्वतःचे घर्मबिंदू,
टिपायला हवे.

स्वतःचे जीवन,
जगायला हवे.
स्वतःचे मरण,
स्वीकारायला हवे.

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

भावनांची भातुकली

सोहळे आनंदाचे,
घडायला हवेत.
सण समारंभ साजरे,
व्हायला हवेत.

हास्यकल्लोळ घरामध्ये,
व्हायला हवेत.
मनमोकळे विचार,
मांडायला हवेत.

हेव्यादाव्यांची जळमटे,
काढायला हवेत.
माणसांची मने,
जुळायला हवेत.

भातुकलीचे खेळ,
मांडायला हवेत.
निरागसतेचे पाझर,
फुटायला हवेत.

गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

गोड चिमुकली

बसची वाट बघत उभा,
होतो कोवळ्या उन्हात.
हळूच आली एक छकुली,
डोळ्यांसमोर क्षणात.

ऐटीत बसली होती ती,
छान सायकल वरती.
सोबतीला आजोबा तिचे,
सायकल भोवती फिरती.

गोड चेहरा होता तिचा,
मुखी हास्य छान.
वाटू लागले चिमुकलीवर,
ओवाळावा प्राण.

अलगद मान फिरवून ती,
मला बघू लागली.
डोळ्यानेच निरोप घेऊन,
खूप गोड हसली.

बुधवार, २९ जानेवारी, २०२०

आनंदाचे कुंभमेळे

आनंदाचे कुंभमेळे,
चहूबाजूंनी भरती.
नजर लागते शोधायला,
प्रयत्न तया लागती.

चिवचिवणारे पक्षी नभी,
उधळणारी माती.
कोवळ्या ऊन्ही बागडणारे,
इवले पिल्लू मोती.

हुंदडणारा बालचमू की,
निरागसतेचा झरा.
चिंब भिजवी हास्यफवारा,
आनंद हाचि खरा.

मान डोलवी गाण्यावरती,
श्रमिक एक बापडा.
हास्य तयाचे चेहऱ्यावरती,
आनंद तिथे सापडा.

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

स्वाभिमान

ज्याचे त्याचे दुःख त्याला,
इतरांना तो बुडबुडा.
फुगवट्याचे कौतुक,
फुटता निस्तरे न राडा.

शब्द होऊनी फुंकर,
सुख क्षणिकसे देती.
मात्रा नसे औषधाची,
भळभळ दिनराती.

रुंदूनी कवटाळी ऊरी,
बोच एकलेपणाची.
एवढे कमी असावे,
भर त्यात भळभळीची.

व्हावे आपण मलम,
आपणची पट्टी छान.
टिके त्वेष जगण्याचा,
श्वास होता स्वाभिमान.

सोमवार, २७ जानेवारी, २०२०

संस्कार

संस्कारांची ऊब येते,
कामी अडचणीत.
पाय घसरता सावरावे मग,
घटना ह्या अगणित.

प्रलोभनांचा पडता वेढा,
मन जाई गांगरून.
आठवते शिकवण मोठी,
सुटका संकटातून.

धर्मयुद्ध तर रोज चालते,
त्वेष उसळूनी येई.
संयमाचा उलगडतो अर्थ,
मन शांत होई.

भाग्य लागते भेटाया ही,
संस्कार शिदोरी.
तरे शेवटी नाव कमावूनी,
भान ठेवी स्वारी.

रविवार, २६ जानेवारी, २०२०

माणुसकी

पोटापाण्याच्या व्यापात,
झुळूक भेटते कधी.
माणुसकीचे दर्शन सहज,
होऊन जाते कधी.

अपघातात सापडलेला,
जीव पाणी पितो.
अनोळखी त्या हातास,
धन्यवाद देतो.

अंधारात लेक चुकता,
धीर मायेचा देतो.
लेकीबाळीला सुखरूप घरी,
पोहोचवून येतो.

हात सुटलेले बाळ कुणाचे,
नकळत कुणा बिलागते.
यक्ष प्रयत्न कुणी करता,
भेट आईशी होते.

शनिवार, २५ जानेवारी, २०२०

प्रेमाचा मोर

मिलनाची ओढ तुझ्या,
माझ्या डोळी साचली.
तुझी माझी भेट होता,
चमक डोळी हासली.

क्षण क्षण तो तपापरि,
तुझ्याविणा भासला.
भान नसे वेळेचे ही,
काळ जणू नासला.

नजर असे शून्यामध्ये,
शून्यामध्ये मी कसला.
उदासल्या मनाला या,
विराहाचा दंश झाला.

दृष्टिक्षेपी तू येऊनि,
आनंदाचा सूर लागला.
माझ्या मनी, नंदनवनी,
गडे प्रेमाचा मोर नाचला.

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

कळले ना

बुरशी नात्यांवरची,
कधी लागे कळले ना.
शर्थ वाचण्या नाती,
खुजी पडे कळले ना.

गोड बोलून नात्यांचा,
घात होई कळले ना.
चोर कनवटीचे हे,
उपद्व्यापी कळले ना.

अख्खी हयात संपली,
गोंजारून कळले ना.
चटकेच भाग्यातले,
नशीब हे कळले ना.

रक्त ओका, जीव टाका,
होरपळ कळले ना.
जळणे हे भोगातले,
भोगताना कळले ना.

गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

बुडणारे जीवन

चिडचिड कधी व्हायला,
वेळ लागत नाही.
जगण्याचा रे गड्या,
मेळ लागत नाही.

मनी जळमट व्हायला,
कोळी लागत नाही.
त्यात अडकून जायला,
डोळे लागत नाही.

सरळ वाट चुकायला,
अंधार लागत नाही.
तोंडघशी पडायला,
दगड लागत नाही.

कुजून कुजून मरायला,
कीड लागत नाही.
जीवन बुडून जायला,
शीड लागत नाही.

बुधवार, २२ जानेवारी, २०२०

जीवन रुंदन

ओझे असे मानेवर,
कशाचे माहीत नाही.
तणावाचे विष सदा,
अंगी भिनत राही.

दिवस उजाडला तरी,
कसला उत्साह नाही.
पहिली नजर घड्याळावर,
धाकधूक सुरू होई.

कधी होई संध्याकाळ,
दिवस कुठे जाई.
दिवस वाटे इवलुसा,
क्षणात विरून जाई.

पळांमागे पळता पळता,
संपून जाई जीवन.
जगायचेच राहून गेले,
कधी येईल शहाणपण.

मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

गर्विष्ठा

गडे तुझा अहंकार,
जगी चिलटा एवढा.
खुमखुमी कशी तुझी,
अहंकार तो केवढा.

तू मी क्षुद्र प्राणिमात्र,
जगाच्या ह्या पसाऱ्यात.
हवे कसे तुला बाई,
सर्व तुझिया कह्यात.

गुर्मी येते ही कोठुनी,
दांभिक तुझे वागणे.
कशासाठी अट्टाहास,
काय तुझे ग मागणे.

गोष्ट ध्यानी एक ठेव,
आहे अंत प्रत्येकाला.
केला किती थयथयाट,
भेटणे आहे मातीला.

सोमवार, २० जानेवारी, २०२०

शुभेच्छांचे उधाण

शुभेच्छांचा पाऊस पडता,
मन होते मोर.
थुईथुई नाचे आनंदाने,
उत्साहाला जोर.

विसर पडतो विवंचनेचा,
होई हलके मन.
वाऱ्यावरती तरंगताना,
अनुभवी प्रत्येक क्षण.

गळुनी पडती पाश भोवती,
स्वैर व्हावेसे वाटे.
दाही दिशा खुज्या वाटती,
स्वातंत्र्य जणू भेटे.

राहावे सदा अश्या स्थितीत,
ही इच्छा असे मनी.
सुखसुमनांचा गंध असावा,
माझ्या अंतिम क्षणी.

रविवार, १९ जानेवारी, २०२०

कर्त्याचा कडेलोट

मरण झाले स्वस्त,
जगणे झाले महाग.
आयुष्याच्या पसाऱ्याचा,
येई सदा राग.

ऊर फुटेस्तोवर धावे,
कर्ता माणूस घरात.
माणूस म्हणून किंमत नाही,
निघे शाब्दिक वरात.

सगळा व्याप कुणासाठी,
प्रश्न मोठा आहे.
घरचा पोशिंदा बाकी,
सदा छोटा आहे.

निराशेचे दर्शन होई,
याला जळी स्थळी.
नात्यांच्या या जंजाळात,
मुकाट जातो बळी.

शनिवार, १८ जानेवारी, २०२०

तू घरी नसलीस की

तू घरी नसलीस की,
घास गिळत नाही.
भरलेल्या ताटाला,
चव लाभत नाही.

तू घरी नसलीस की,
वात फुलत नाही.
देवघरातला देव माझा,
कधीच हसत नाही.

तू घरी नसलीस की,
फुल डुलत नाही.
खतपाणी घातलेले,
रोप फुटत नाही.

तू घरी नसलीस की,
घर बोलत नाही.
घड्याळाच्या काट्यांसवे,
क्षण डोलत नाही.

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

तळतळाट

वाटे द्यावी दुश्मनांच्या,
पेकटात लाथ.
उपद्रवी ही पिलावळ,
किड्यामुंग्यांची जात.

कोळदांडा बनूनी गळी,
खोडा घालत जाती.
दुश्मनाही लाजवणारी,
काय कामाची नाती.

कुरापतींचे महारथी हे,
विघ्नसंतोषी प्राण.
बांडगुळा सम शोषणारी,
जीवनातली घाण.

फेरा बनतो मग कर्माचा,
गळी यांच्या फास.
काळ बसता उरावरी मग,
होतो शेवट खास.

गुरुवार, १६ जानेवारी, २०२०

मज आवडतो भाव

करशी गडे गोंधळ,
होई तुझी धावाधाव.
तुझ्या वेंधळेपणाचा,
मज आवडतो भाव.

खोडसाळपणा तुझा,
मग निरागस भाव.
तुझ्या आगाऊपणाचा,
मज आवडतो भाव.

गाल फुगता रागाने,
त्याचा करे मी पाडाव.
तुझ्या लाडीकपणाचा,
मज आवडतो भाव.

ओल माझ्या खांद्यावरी,
तुझ्या डोळ्यांचे आसव.
तुझ्या प्रांजळपणाचा,
मज आवडतो भाव.

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

मानवा बरं नव्हं

टिंभा मिरवी तू ग चा,
दिसे आपपरभाव.
कैसा तुझा मी पणा हा,
मानवा बरं नव्हं.

तुझा हैदोस चालतो,
करी सदा तू तांडव.
कैसा तुझा अट्टाहास,
मानवा बरं नव्हं.

दुखवीशी आप्तेष्ट,
तुझ्या मनाचा ना ठाव.
कैसा तुझा हेका सदा,
मानवा बरं नव्हं.

मग एकटा पडशी,
तुझे आक्रंदाचे गाव.
कैसा तुझा हा शेवट,
मानवा बरं नव्हं.

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

पैशाचा लोभ

लोभ पैशाचा नको,
होते माती माणसाची.
जोड अहंकाराची,
दाणादाण आयुष्याची.

मिंधा होऊन माणूस,
नातीगोती ओरबाडी.
मीपणाचा रे हैदोस,
चुके आयुष्याची गाडी.

जिवलग दुरावती,
समजूत रे काढून.
व्याप आयुष्याचा फसे,
उपद्व्याप हे वाढून.

अंत लोभापायी होता,
हाल कुत्रा न खाई.
तिरडीही हो वंचित,
चार खांदेकरी नाही.

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

मनातले घर

जीव कोणीही असू दे,
ओढ घराची लागते.
सांज दाटता भोवती,
जग घराशी धावते.

माया पांघरुणी माथी,
डोई छत घर देते.
बागडाया हवेतसे,
घर पाया स्थिर देते.

देवघेव प्रेमाची,
घर कारण बनते.
बंध दाटती नात्यांचे,
घर एकोपा साधते.

पिढ्या पिढ्यांचा संसार,
घर आजन्म पहाते.
घरातल्या जीवांसाठी,
घर मनात रहाते.

रविवार, १२ जानेवारी, २०२०

चहा

वेळ चहाची नसते,
चहा वेळेला लागतो.
आठवणींना गाळता,
पेला हाती वाफाळतो.

दरवळ पसरता,
भूतकाळात शिरतो.
आठवणींचा तवंग,
साय होऊनी दाटतो.

ओठ प्याल्याला भिडता,
ऊब प्रेमाची आठवे.
एक प्याला, जीव दोन,
रंग गुलाबी साठवे.

घोट पहिला चहाचा,
मन प्रसन्न करतो.
घोट रिचवतो क्षण,
माझ्या मनी तो कोरतो.

शनिवार, ११ जानेवारी, २०२०

पंचतारांकित आळस

झाकोळ धुक्याचे दाट,
एक उदास पहाट.
सूर्यनारायण झोपे,
सुस्तीची जाणवे लाट.

रेंगाळले प्राणिमात्र,
दिनक्रम करताना.
सुस्ती अंगी भिनलेली,
मोठा आळस देताना.

अंग मोडून गेलेले,
वाटे झोपून राहावे.
दुलईत गुंडाळून,
मुटकळून पडावे.

व्याप कामाचा डोक्यात,
कलकलाट करतो.
झटकूनी हा आळस,
पोटापाण्याला लागतो.

शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

आठवणींची पोतडी

आठवणींची पोतडी,
हळू सोडवू लागलो.
अलगदपणे त्यांना,
स्वये निरखू लागलो.

काही थंडगार होत्या,
स्पर्श बधिर होणाऱ्या.
उष्ण आठवणी काही,
माझा हात पोळणाऱ्या.

मुलायम उबदार,
स्पर्श काहींचा जाणवे.
तीक्ष्ण स्वभावतः काही,
बोच परि न मानवे.

गांगरून टाके मला,
रूप एकेकीचे न्यारे.
पोतडी पुन्हा बांधता,
मनी फुटती धुमारे.

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

विसावा नात्यांचा

सोहळा असो कसला,
आनंदा उधाण येई.
लगबग होई मग,
त्रेधातिरपीट होई.

सुरुवात तयारीची,
की तयारीची सुरुवात.
थोडे थांबू, मग बघू,
म्हणायची नाही बात.

आमंत्रण पाठवून,
उजाळा नात्याला येई.
ओढ भेटण्याची वाढे,
भरते प्रेमाला येई.

गोतावळा जमे मोठा,
होती गप्पा टप्पा किती.
व्यापामुळे धावणारी,
विसावती नाती गोती.

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

नात्यांचा आधारवड

आजारपणात हात मायेचा,
आधाराला येतो.
उमेदीने उभे राहण्या,
उर्मी नवी देतो.

शरीराचा दगाफटका,
मन खच्ची करतो.
घास मायेचा मुखाशी,
बळ नवे देतो.

आधीच तोंड कडू,
त्यात औषधांची भर.
ऊब उशाशी प्रेमाची,
गड परिस्थितीचा सर.

प्रियजनांचा आधारवड,
असतो सदा पाठी.
तावूनसुलाखून घट्ट होती,
ह्या जन्मांच्या गाठी.

मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

स्त्री माहात्म्य

बायको बडवते लॅपटॉप,
नवरा मळतो कणिक.
समानतेच्या ह्या जगात,
स्त्री झाली माणिक.

जागर होई स्त्रीशक्तीचा,
बरोबरीचे नाते.
डंका वाजे पराक्रमाचा,
समाज स्तवने गाते.

प्रगतीचा गोफ पकडूनी,
कुटुंब उध्दारते.
कुटुंबातुनी समाजाकडे,
समृद्धी वाहते.

आदर करूया नारीजातीचा,
देऊ तिजला मान.
सुवर्णाक्षरी लिहिले जाईल,
इतिहासातील पान.

सोमवार, ६ जानेवारी, २०२०

तत्वांची भाकर

तुझ्या नाराजीचा सूर,
माझा जळतोया ऊर.
आगळीक काय माझी,
सुख उडलेया भुर.

तत्वातत्वाचे हे वाद,
होई किती शंखनाद.
तुझ्या माझ्या प्रेमपुढे,
ह्याची कसली बिशाद.

राख डोक्यात घालते,
तुझा सात्विक संताप.
त्रास दोघांनाही होई,
भेसूरसा हा आलाप.

चुलीत जावो हे वाद,
भाजू त्यावर भाकरी.
तत्वापाशी तत्व असे,
कसोटी प्रेमाची खरी.

रविवार, ५ जानेवारी, २०२०

तूच मजला शाप आहे

बांडगुळा सम तू लपेटली,
वठलेले मी झाड आहे.
जीवनी या भोग माझे,
तूच मजला शाप आहे.

गळवा सम तू चिकटली,
शोषिलेला मी प्राण आहे.
जीवनी या भोग माझे,
तूच मजला शाप आहे.

झाकोळी सम तू व्यापली,
कोंडलेला मी प्रकाश आहे.
जीवनी या भोग माझे,
तूच मजला शाप आहे.

मृत्युछाये सम तू ठाकली,
अडकलेला मी श्वास आहे.
जीवनी या भोग माझे,
तूच मजला शाप आहे.

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

सल

काळजात माझ्या आहे,
सल ठसठसणारी.
माझे दुःख लखलाभ्य,
नसे कोणी कैवारी.

ओरखडे मारणारे,
जीव घायाळ करती.
दुःख मूके होई माझे,
हळू स्फुंदून रडती.

परिस्थितीशी भिडून,
हस्तरेषा फिकी होई.
भोग भोगून जीवाला,
हमी भविष्याची नाही.

कंठशोष दडपतो,
आप्तांच्या भल्यासाठी.
अडखळत चालतो,
जिवलग आडकाठी.

क्षणाक्षणाला तुटणे,
तुटण्यातून मरणे.
परिस्थितीशी रचतो,
माझ्यासाठी मी सरणे.

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

सुट्टीशी गट्टी

सुट्टी लागता सर्वांना,
आखणी होते बेतांची.
इच्छा पोतडी भरून,
मौज सर्वां करायची.

चिल्लीपिल्ली चेकाळाती,
स्वप्न मनी रंगवती.
मौज मोठ्यांना वाटते,
खर्च मनी चालू होती.

गाठीभेटी होत जाती,
घट्ट होत जाती नाती.
दिला घेतला जिव्हाळा,
मुले बाळे हुंदडती.

कुटुंबाचा पाया इथे,
नकळत पक्का होई.
वेढा दुःखाचा पडता,
हीच माया कामी येई.

गुरुवार, २ जानेवारी, २०२०

देवाचे देवपण

पूजा कधी चुकल्यास,
देव रुसत नाही.
पूजा रोज केल्यास,
देव हसत नाही.

रांगोळी चुकल्यास,
देव रुसत नाही.
रांगोळी रेखल्यास,
देव हसत नाही.

दिवा चुकून विझल्यास,
देव रुसत नाही.
दिवा फडफडता झाकल्यास,
देव हसत नाही.

सर्वव्यापी सर्वदेखी,
देव रुसत नाही.
लेकरे त्याची धडपडल्यास,
देव हसत नाही.

बुधवार, १ जानेवारी, २०२०

नववर्षा हे मागणे

नववर्षा हे मागणे,
जगी आनंद नांदू दे.
धर्म मानवतेचा हा,
कलेकलेने वाढू दे.

नववर्षा हे मागणे,
लेकीबाळींना हसू दे.
सामर्थ्य अंगी बाणूनी,
नाश दैत्यांचा होऊ दे.

नववर्षा हे मागणे,
बळीराज्य तू येऊ दे.
अस्मानी संकट नको,
त्यास समृद्धी लाभू दे.

नववर्षा हे मागणे,
बंधुभावाला वाढू दे.
वाहो चैतन्याचा झरा,
नंदनवन होऊ दे.

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...