गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

खर्डेघाशी

खर्डेघाशी करून,
जीव आंबून जातो.
त्याच त्याच जगण्याचा,
खूप कंटाळा येतो.

काम बदलून बदलून,
किती बदलत जाणार.
कधीतरी त्याला,
तोच तोचपणा येणार.

दिवस उडून जातील,
वर्षे संपून जातील.
चक्रामध्ये फिरता फिरता,
क्षण विरून जातील.

सगळी कामे संपतील,
पण एक काम राहील.
जगण्याच्या या पसाऱ्यात,
जगायचेच राहील.

बुधवार, २९ एप्रिल, २०२०

आयुष्याचे लोणी

तोंड घालणारी माणसे,
वा तोंड घालणारे मांजर.
हेकेखोर स्वभावाला,
कोण घालणार आवर.

आयुष्याचे शिंकाळे,
लोंबतच राहाते.
बोक्यांचे लक्ष त्याच्या,
लोण्यावर राहाते.

संधी मिळताच झडप,
तुटून पडतात बोकी.
उलथेपालथे आयुष्य,
येतात नऊ नाकी.

झडपेपासून सावरण्यातच,
खर्ची आयुष्य होते.
आयुष्याच्या लोण्याचे,
स्वाद घेणे राहाते.

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

गाडलेली भुते

आळशी एक विचार,
जांभई देत उठला.
नको त्या गोष्टीचा,
किस पाडत बसला

भंडावून सोडले,
शांत निरव मन.
जणू हिरव्या रानी,
तुडवत गेला तण.

हलकल्लोळ कसला,
अचानक मजला.
अचंबित वातावरण,
गोंधळ कसला?

गाडलेली भुते,
जमिनीतच बरी.
उकरून काढता त्यांना,
त्रेधा उडते खरी.

सोमवार, २७ एप्रिल, २०२०

सैर आठवणींची

किती निरव शांतता,
किती स्थिर वेळ.
एका जागी नीट बसता,
विचारांचा मेळ.

शांत बसून आठवावे,
आनंदाचे क्षण.
खट्टू नाही होणार,
आळसावलेले मन.

अलगद उलगडावे,
पदर आठवांचे.
पुन्हा चकाकतील,
रंग भावनांचे.

आभासी का होईना,
मौज येईल मोठी.
आठवणींच्या राज्यात,
सैर होईल छोटी.

रविवार, २६ एप्रिल, २०२०

अडलेले क्षण

थकलेल्या तुझ्या जीवाचे,
हाल बघवत नाही.
ओझे जीवाला जीवाचे,
त्रास संपत नाही.

त्रासलेल्या तुझ्या मनाचे,
रुंदन आवरत नाही.
चिंता जीवाला जीवाची,
लागणे थांबत नाही.

सुजलेल्या तुझ्या पायांचे,
दुखणे थांबत नाही.
करुणा जीवाला जीवाची,
वाटणे राहावत नाही.

अडलेल्या तुझ्या क्षणांचे,
अडखळणे लपत नाही.
विचार जीवाला जीवाचे,
सुचणे संपत नाही.

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

माज कशाचा?

तऱ्हेवाईकपणाचे,
कोडे तुझे मोठे.
चुका करुनि भाव खाशी,
मोठेपण खोटे.

अडेलतट्टू भूमिकेतून,
ताण वाढवीत जाशी.
सहजच येशी जमिनीवर,
पडता तू तोंडघशी.

माज कशाचा तुज एवढा,
प्रश्न सदा मज पडे.
आक्रस्ताळे वागूनी शेवटी,
व्हायचेच ते घडे.

तोटा होई तुजला मोठा,
माती तव मानाची.
चुकांतूनी तू काय शिकशी,
इच्छा ना तुज त्याची.

शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

वाट त्याची पाही

माखलेले शील तुझे,
भोवताली पाही.
प्रारब्धाचे भोग तुझे,
वाट त्याची पाही.

वाकडे पाऊल तुझे,
भोवताली पाही.
अभागी भाग्य तुझे,
वाट त्याची पाही.

वस्तुनिष्ठ प्रेम तुझे,
भोवताली पाही.
एकटे भविष्य तुझे,
वाट त्याची पाही.

डावपेच खेळ तुझे,
भोवताली पाही.
उलटणारे फासे तुझे,
वाट त्याची पाही.

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

मूकपणे रडतो

चुरडलेला पाचोळा मी,
तुझ्या सवे उडतो.
पायदळी तुडवून सुद्धा,
मूकपणे रडतो.

वठलेले खोड मी,
एकटा सदा पडतो.
छाटला जाऊन सुद्धा,
मूकपणे रडतो.

गावलेला मासा मी,
एकटा तडफडतो.
फसवला जाऊन सुद्धा,
मूकपणे रडतो.

अडकलेला श्वास मी,
मरणा संगे भिडतो.
कोंडला जाऊन सुद्धा,
मूकपणे रडतो.

बुधवार, २२ एप्रिल, २०२०

विषारी प्रेम

किंमत माझ्या प्रेमाची,
बोललो नाही.
तुझ्या उथळ प्रेमात,
तोललो नाही.

गोडी माझ्या प्रेमाची,
चाखलो नाही.
तुझ्या कडवट प्रेमात,
ओकलो नाही.

रंग माझ्या प्रेमाचे,
पांघरलो नाही.
तुझ्या बेरंगी प्रेमात,
गांगरलो नाही.

अमृत माझ्या प्रेमाचे,
प्यायलो नाही.
तुझ्या विषारी प्रेमात,
राह्यलो नाही.

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

अंतरीचे सूर

अंतरीचे सूर माझ्या,
कधी थेट हे लागती.
शब्द आठव दावती,
घटनांचे.

विस्मयकारक होती,
अर्थ नव्याने लागती.
कशी हरवली नाती,
जवळची.

तिढे सुटण्या लागती,
मनी हिशोब मांडती.
काय उरणार हाती,
वजा जाता.

बाजू सर्वांच्या पटती,
तरी वारे घोंगावती.
स्वभावाने होते माती,
उद्धटांच्या.

सोमवार, २० एप्रिल, २०२०

सत्य

सत्य असे कालातीत,
सत्य परिस्थितीजन्य.
सत्यशोधाचे हे पुण्य,
कोणा मिळे?

सत्य बारीकशी रेती,
हाती सहज ना येती.
शर्थ करावी लागते,
प्रयत्नांची.

सत्य धक्का देई कधी,
भयचकितच होई.
डोळा अंधारी ही येई,
ऐकून ते.

सत्य वैश्विक रूपाने,
खोल खोल होत जाणे.
गुंतती तयात मने,
कैक येथे.

रविवार, १९ एप्रिल, २०२०

तुझ्यासोबत असताना

तुझ्यासोबत असताना,
क्षण उडून जातात.
प्रेमाच्या मधामध्ये,
ओठ बुडून जातात.

तुझ्यासोबत असताना,
सप्तरंग दिसतात.
घरातल्या कुंडीतली,
पानेफुले हसतात.

तुझ्यासोबत असताना,
वारा होतो धुंद.
कातरवेळी खुणावे
नभी तारा मंद.

तुझ्यासोबत असताना,
दिवे मालवून जातात.
निशेच्या उदरात,
क्षण सुगंधी होतात.

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

रडगाणे

रोजचेच रडगाणे,
रोजचेच मढे.
व्यापाचा सूर्य कसा,
डोईवरी चढे.

तोचतोचपणा असे,
तेचतेच वागणे.
नाविन्याचा वास नाही,
कुबट कुबट जगणे.

दिवस मोजत ढकलावा,
गोळाबेरीज मांडत.
हिशोबाला अंत नाही,
नाही दौत सांडत.

दुरून डोंगर साजिरे,
ज्याचे त्याचे जगणे.
मातीच्याच चुलीवरी,
मातीची भाकर थापणे.

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

उलटणारी रात्र

संथ झालीये रात्र,
निपचित पडलाय वारा.
उकाड्याने हैराण जग,
पंख्याचा कोंदट वारा.

खाल्लेलं पचतंय आता,
पोटामध्ये हळू.
दिवसभर हुंदडणारे मन,
निपचित पडले वळू.

अर्धोन्मेलित पापण्यांना,
झोप लागली येऊ.
हळूच चावणाऱ्या डासांचा,
जीव कसा घेऊ?

ह्या रात्रीच्या पाठोपाठ,
चालू पान उलटेल.
ताज्यातवाण्या दिवसासंगे,
नवे पान भेटेल.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

मी व्हावे गुलाब

मी व्हावे गुलाब,
इवल्याश्या कुंडीतले.
क्षण जगावे वाऱ्यासावे,
सुगंधी धुंदीतले.

उष्णतेने लाही लाही,
माझ्या मातीची होईल.
झुळूक अलगद वाऱ्याची,
सुख देऊन जाईल.

तृप्त होईल मन,
रतीब पाण्याचा होता.
आनंद येईल उधाण,
खत मातीत मुरता.

शुष्क होताना पाकळ्या,
मी निस्तेज होईल.
गळणाऱ्या पाकळ्यांसवे,
विस्मृतीत जाईल.

बुधवार, १५ एप्रिल, २०२०

काट्याचा हेवा

विचारांचे मळभ,
दाट होत जाई.
अंधाराच्या आडून,
मन चिरकत राही.

अनिश्चित काळ,
किती दिवस चालणार.
स्थिर झाले जग,
जागचे कधी हलणार.

बसून बसून नुसते,
वेळ खायला उठतो.
उर्मी किती टिकणार,
निराशेला गाठतो.

अलगद वळवून मन,
घड्याळ बघत बसतो.
पळणाऱ्या सेकंद काट्याचा,
हेवा वाटत राहतो.

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

निद्रानाशाचा विळखा

निद्रानाशाचा विळखा,
होत जाई गडद.
चिंता पांघरून मन,
बसे सदा कुढत.

भूतकाळातील धक्के,
डोके वर काढती.
वेळकाळाचे भान कसले,
तास उडून जाती.

मन रवंथ करत बसे,
तेच जुने प्रसंग.
पुन्हा होती तेच क्लेश,
गडद होती रंग.

घोरत पडे जग सारे,
मी टक्क जागा.
कसे थांबवू विचार,
कसा थांबवू त्रागा?

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

अपेक्षेपोटी प्रेम

अपेक्षेपोटी प्रेम,
अळवावरचे पाणी.
किती कसे सावरणे,
असते अजब कहाणी.

नात्यांच्या ह्या गुंत्यात,
जीव अडकून राही.
भाबड्याला त्या वाटे,
दुःख कशाचे नाही.

अलगद फेरा फिरतो,
आभासी नात्यांचा.
उसळी मारे दुःख,
चुरा पडे प्रेमाचा.

खरेखुरे ते प्रेम,
ओळखायला हवे.
लाभे ना सर्वांना,
हे मानायला हवे.

रविवार, १२ एप्रिल, २०२०

नाविण्याशी सुत

कैक दिसांनी कुंडीमधले,
रोप माझे बहरले.
फुलफुलांच्या गुच्छाने,
रोप माझे डंवरले.

दिसांमागुनी दिवस जाहले,
कळी उमलली ना कधी.
वाढ खुंटली, कोंब कुठले,
फांदी फुलली ना कधी.

रतीब वाढता पाण्याचा,
जोड खताची मग मिळे.
खुराक तो नेमका लाभता,
तरारूनी फुटती मुळे.

कलाटणी ही मिळता रोपा,
ओकेबोकेपणा गळे.
चैतन्याची नांदी येई,
नाविण्याशी सुत जुळे.

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

साधू संधी

कोरोनाचा बंदीवास,
समजतो मी संधी.
करा नवी सुरुवात,
बना थोडे छंदी.

अडगळीत पडलेली,
पुस्तके काढा हळू.
एकदा वाचनात बुडाले,
की धावेल वेळेचे वळू.

वाद्य हौशेने घेतलेले,
साफसूफ करून घ्या.
घरच्यांना घरगुती,
संगीत मैफिल द्या.

एवढा फावला वेळ,
पुन्हा भेटेल काय?
आत्मचिंतनात बुडायला,
एकांत मिळेल काय?

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

एकटा बंदिस्त मी

कोंडलेल्या घरामध्ये,
कोंडलेल्या चौकटी.
दिवस असू दे वा रात्र,
मीच माझी सोंगटी.

दिशा असल्या मोकळ्या,
परि भिंतीने त्या आखल्या.
काय होई मग पुढे,
ह्या चिंतेने त्या माखल्या.

जीवनाची निश्चिती ना,
भविष्याची मज हमी.
जग इथे हे थांबलेले,
धावे पूर्वी नेहमी.

अनिश्चिताचा काळ हा,
वेळ पडतो ना कमी.
कुंपणात बांधलेला,
एकटा बंदिस्त मी.

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

माझे प्रेम असे जणू

माझे प्रेम असे जणू,
कोसळता पावसाळा.
तुला संतत प्रेमाचा,
उपजत असे लळा.

माझे प्रेम असे जणू,
उचंबळणारी लाट.
तुझ्या मनी शांत किनारा,
आवडे नाजूक लाट.

माझे प्रेम असे जणू,
वादळी सोसो वारा.
तुझे मन नाजूक वेल,
झुळुकीशी संग न्यारा.

माझे प्रेम असे जणू,
पर्वते ज्वालामुखीची.
तुझ्या मनी कातरवेळ,
ओढ तया टेकडीची.

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

रुंदन

भूतकाळाच्या सावल्या,
भूत होऊन फिरतात.
भविष्याचे धागे,
गुंफण्या आधीच विरतात.

कडकडाट करत,
वीज भेदून जाते.
स्वप्नाळू हे मन,
रुंदन मुके गाते.

निद्रानाश होतो,
आयुष्याचा भाग.
प्रातःकाळी कसली,
येई भाग्या जाग.

भुलभुलैय्या ऐसा,
वाढत वाढत जातो.
रक्ताळल्या हृदयामधुनी,
जीवनगीत गातो.

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

भरारी

माझी शकले उडली,
हाळी उठली गावी.
लटांबरे उलथली,
पाहण्या मौज नवी.

कुत्सित हास्यकटाक्ष,
खोटे अश्रू डोळी.
वरवरची विचारणा,
दुःख कशाचे पाळी.

औलादी गिधाडांच्या,
लचके मजेने तोडी.
करकचूनी हे पाश,
मज एकटा सोडी.

परि त्यांसी न ठावे,
शकले माझी असती.
सृजन धर्म हा माझा,
फिनिक्स माझ्यात वसती.

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

तासखेडा गाव

आज आठवे मजला,
मित्राचे ते गाव.
कच्च्या वाटेने गवसे,
त्याचा अलगद ठाव.

घरे इटूकली असती,
टप्प्याटप्प्यावरती.
शेतांमधुनी दिसते,
काळी आई धरती.

बागा केळीच्या तिथे,
दुतर्फा पसरलेल्या.
गावकऱ्यांच्या प्रेमामध्ये,
कडक ऊन त्या विसरल्या.

कडेकडेने वाहे,
नदी भरून दुथडी.
दृश्य वेड लावते हे,
गावी तया तासखेडी.

रविवार, ५ एप्रिल, २०२०

चिंतातुर मन

प्रश्न मारावेत फाट्यावर,
उत्तरे शोधावेत सडकून.
आयुष्याच्या व्यापामध्ये,
जाऊ नये अडकून.

रहाटगाडगे जगण्याचे,
गोलगोलच फिरणार.
उठसुठ धावलो तरी,
आपण किती पुरणार?

होईल तेवढे करत राहावे,
मनापासून आपण.
अपेक्षा ह्या अनंत असती,
कुठवर करणार आपण?

जगण्याचा आनंद असावा,
न्यूनगंड हा कशाला?
क्षणोक्षणी जल्लोष असावा,
चिंतातुर मन कशाला?

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

नवा दिवस

दिवसभर आळसावूनही,
झोप होत नाही.
झोपेतून उठले तरी,
पापणी उघडत नाही.

उठता झोपेतून होई,
जांभयांचा उद्रेक.
डोळे चोळून बेजार,
येई पाणी ही क्षणिक.

आठवत राहती स्वप्ने,
रात्रभर पडलेली.
तर्क कसले लागू,
विचारांची खांडोळी.

तळहातांनी चेहरा चोळून,
आळस झटका जरा.
आळोखे पिळोखे देऊन,
दिवसाची सुरुवात करा.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

व्यायाम

शारीरिक कसरतीचा,
फायदा मोठा भारी.
अंग होते मोकळे सगळे,
व्याधी होतात बरी.

दिवसभर बसून बसून,
अंग जाते आकसून.
व्यायामाने अंग झटकता,
आळस जातो निघून.

घमेजलेल्या शरीराचा,
गंध मजेशीर येतो.
शारीरिक कष्टाचे तो,
महत्व सांगून जातो.

निरोगी असावे आयुष्य,
व्यायाम असावा पाया.
निरोगी मन, निरोगी तनी,
आनंद जीवनी याया.

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

वेळेचा कुबेर

गरगर फिरणारा पंखा,
बाहेर किलबिलाट.
बंदीवासामधील जगाचे,
अस्तित्व ह्या खुणांत.

क्वचित येई आवाज,
धावणाऱ्या गाडीचा.
थोडासा भंग होई,
बोजड ह्या शांततेचा.

घड्याळाची टकटक,
स्पष्ट ऐकू येई.
स्थळकाळाचे भान,
सहज जाणवून जाई.

स्थूल ऐशा शांततेसम,
मन स्थूल होई.
वेळेचा मी कुबेर,
नसे कसली घाई.

बुधवार, १ एप्रिल, २०२०

एप्रिल फुल नको!

एप्रिल फुल करू नका,
प्रसंग आहे बाका.
जनाची नाही तरी,
मनाची तरी राखा.

दिवसाढवळ्या हजारो,
माणसे मरती जगभर.
विचार करा गोंधळ होईल,
फाजिलपणा क्षणभर.

कोरोनाचे संकट आता,
होत आहे मोठे.
वायफळ संदेश करतील घोळ,
असो कितीही छोटे.

समाजमाध्यम शस्र आहे,
वापर झाल्यास योग्य.
गळा आपल्याच लागेल पाते,
हेतू असता अयोग्य.

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...