सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

बाप पाठीशी नसता

बाप पाठीशी नसता,
होई आभाळ पारखे.
सदा वैशाखवणवा,
मन उदास सारखे.

अशा जगण्याची धग,
होरपळून टाकते.
कोण स्नेही जवळचा,
जग सापत्न वागते.

हेवेदावे रुपी भाले,
रक्तबंबाळ करती.
नाते झिडकारण्याला,
शर्थ प्राणाची लावती.

पुरे पुण्याई बापाची,
शेवटच्या क्षणालाही.
जगी नसला तरीही,
बाप सदा मनी राही.

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

लेक माझा दोस्त

चल गड्या,सवंगड्या
आता दोस्ती ही करू.
बाप लेकाच्या पल्याड,
नवे जग हे साकारू.

आळीमिळी गुपचिळी,
खोड आईची काढता.
देऊ टाळी जोरदार,
जरा गमजा करता.

कधी गुपित सांगूया,
एकमेकांना विशेष.
गळाभेटीने वाटूया,
आसू डोळ्यातले खास.

कधी हातावर झुला,
कधी पाठीवर खेळ.
नाते जुने, नवे जिणे,
जुळे आनंदाचा मेळ.

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

बाळ झोपला

बाळ झोपला,
गाढ झोळीत.
मऊ उबेत,
चर्या हसे.

हात हाताशी,
गुंफे हळूच.
मोठा आळस,
छान दिसे.

मोडतो अंग,
मनापासूनी.
लाळ हाताने,
जरा पुसे.

स्वप्न बघे का,
देवाजीचे हा?
प्रश्न माझिया,
मनी वसे.

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...