वखवखल्या जगाचा,
ताबा सतत सुटतो.
लेक घर सोडताना,
जीव घराचा तुटतो.
वासनांध सावल्यांचा,
वेढा जगाला पडतो.
शील ओरबडताना,
जीव घराचा तुटतो.
दर्प दांभिकपणाचा,
आदर्शवादास येतो.
लेक चुरगळताना,
जीव घराचा तुटतो.
स्वत्व बाईमाणसाचे,
ढोंगी समाज जाळतो.
लेक कोळसा होताना,
जीव घराचा तुटतो.