हाती घेता खतावणी,
आज रुसली लेखणी.
गाल फुगवून बसे,
म्हणे मज कोण पुसे
मनी सुचता तुजला,
शाई भिडे कागदाला.
आटता मनी विचार,
माझा पडतो विसर.
गाऱ्हाणे ऐकून तिचे,
स्मित उमटे गमतीचे.
गोंजारता तिज बोटांनी,
हसू लागली लेखणी.
म्हणे स्वच्छंदे बागडू दे,
पानावर मज नाचू दे.
होता मम पदन्यास,
पूर्ण होई काव्य ध्यास.