सोमवार, २२ मार्च, २०२१

अश्रूवर्षा

अवकाळी पावसात,
तुझे दूर जाणे.
प्रेमवेड्या चातकाचे,
भेसूर वाटे गाणे.

गडगडणाऱ्या ढगांमध्ये,
जोश वाटत नाही.
गरमागरम चहावरती,
साय दाटत नाही.

कोसळणाऱ्या धारांचेही,
गटार होऊन जाई.
अंधारलेल्या जगात,
एकटेपणा साठत राही.

हवेत गारवा कमी,
कुबटपणा जास्त वाटे.
पापण्यांच्या कडांवरती,
अश्रूवर्षा दाटे.

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

भाच्यांची आठवण

शांततेत सकाळ आज,
कल्ला नाही कुठला!
शशी समुचा मामा जरा,
चाचपडतच उठला!

नाही अस्ताव्यस्त अंथरूण,
नाही मामाचा घोष.
बोचणाऱ्या शांततेचा,
वाटे आज रोष.

डॉगीचे स्वैर धावणे,
आज हरवून बसले.
वात्सल्याचे हात माऊला,
कुठेच ना ते दिसले.

आज्जीचा गोंधळ होई,
काही हरवले आज.
पसाऱ्याचा घराला,
नाही उरला साज.

जुगलबंदी मामीसोबत,
कोण करणार आता?
रविवारची गम्मत न्यारी,
कोण मारणार बाता?

गुरुवार, ९ जुलै, २०२०

येशील का गं राधे?

अडकलोय मी कुठेतरी,
तुझ्या असण्यामध्ये.
माझे असणे मान्य करून,
येशील का गं राधे?

तडफडतोय मी कुठेतरी,
तुझ्या नसण्यामध्ये.
माझे प्राण धन्य करून,
येशील का गं राधे?

हरवतोय मी कुठेतरी,
तुझ्या आठवामध्ये.
माझे अर्घ्य दान घेऊन,
येशील का गं राधे?

संपतोय मी कुठेतरी,
तुझ्या आभासामध्ये.
माझा श्वास परत घेऊन,
येशील का गं राधे?

शनिवार, ४ जुलै, २०२०

बाईविना घर

वेळ तुझ्या जाण्याची,
जवळ येत जाते.
का कसे माहीत नाही,
चुटपुट लागत राहते.

एकटा जीव सदाशिव,
मी तसा ही असतो.
घराचा उंबरठा,
का बरे रुसतो?

घरातली कामे होतील,
तू नसली तरी.
सहजता कशी येणार,
जीव फुंकणारी?

कण कण घराचा,
बाईभोवती फिरे.
बाईविना घरामध्ये,
चैतन्य ना उरे.

गुरुवार, १४ मे, २०२०

उन्हाळी सुख

उन्हाळ्याचा ताप,
वाटे मोठा जीवा.
उकाड्याचा कहर,
गरम नुसती हवा.

अंघोळ करतानाही,
घामाच्या धारा हजार.
पाणी कमी, घाम जास्त,
पुसून पुसून बेजार.

पंखा जोरात फिरे,
ऐकू कमी येई.
दिवसभराच्या वादाची,
चांगली सोय होई.

जेवून पोटभर छान,
ताणून द्यावी मस्त.
अख्ख्या उन्हाळ्याची,
एवढीच गोष्ट बेस्ट.

बुधवार, १३ मे, २०२०

व्याप

वेळेचे बंधन,
मानले तर आहे.
कामात आयुष्य,
बुडून राहे.

चक्र कामाचे,
गमतीचे असे.
कायमचे भोवती,
पडती फासे.

गणित कामाचे,
व्यस्त जाता.
आवेग व्यापाचा,
कोणा सांगता?

व्यापही आपला,
तापही आपले.
कष्टाचे फळ,
आपणच चाखले.

मंगळवार, १२ मे, २०२०

चारा

कोवळ्या उन्हात चमके,
धरा तजेली छान.
झुळूक वाऱ्याची हळू,
फुंकी अलगद प्राण.

चिवचिव करती पक्षी,
हळूच कोठेतरी.
झुलत बसती सारे,
एखाद्या फांदीवरी.

हालचालीत त्यांच्या,
लगबग थोडी दिसे.
चारा शोधण्या डोळे,
फिरती वेडेपिसे.

दिसता चारा कोठे,
झुंबड त्यांची उडे.
कलबलाट तो मोठा,
गोंधळ मोठा उडे.

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...