रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

बापाविण सण

अवसान दिवाळीचे,
वाटे उसणे पासणे.
जाई काळजा चिरत,
जगी बापाचे नसणे.

लाडू तोंडा लागे कडू,
चकली वाटे बेचव.
नसे बाप फराळाला,
येई क्षणाला आठव.

वाटे ज्योत पणतीची,
तेजहीन व सुतकी.
ओढ वाटे बापासाठी,
तडफड ही चातकी.

कसे करावे सोहळे,
काय मजा सणातली.
बापाविण पोरका मी,
रुखरुख मनातली.

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

बाळ घरात येणार

होई आकाश ठेंगणे,
मनमोर नाचणार.
माझा कलेजा तुकडा,
बाळ घरात येणार.

किती आस लागलेली,
किती वाट बघणार.
माझ्या मनाचा फुलोरा,
बाळ घरात येणार.

माझी पापणी थकली,
किती पाणी थांबणार.
आसवे ही आनंदली,
बाळ घरात येणार.

कधी होईल मी घोडा,
कधी हात धरणार.
बागडण्या आता पिल्लू,
बाळ घरात येणार.

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

नोकरदाराची व्यथा

नोकरदाराची व्यथा,
कोण घेई समजून.
दसरा दिवाळ सणाला,
घेई दमदार ऋण.

कुणा पाहिजे दागिना,
कुणा हवी नवी साडी,
लेकीला ध्यास ब्रँडचा,
लेका हवी नवी गाडी.

माय आडूनच म्हणे,
करूया रंगरंगोटी.
बाप फाटक्या सोफ्याची,
हळूच काढतो खोडी.

डोके खाजवत मोजी,
पैसा जुजबी खात्यात.
कडू तोंड गोड करी,
लाडू साजूक तुपात.

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

सयेतली माय

सये तुझ्यातली माय,
माझ्या जीवाला भावते.
लटकेच रुसणारी,
बालराजाशी हासते.

टचकन येई पाणी,
प्रिये तुझ्या डोळी कधी.
त्याच नयनी गं सखे,
पुत्रप्रेम चकाकते.

कष्टावून जाई जीव,
रगाड्यात कधी तुझा.
लेकराशी खेळण्यात,
माय प्रसन्न पावते.

कधी तुझ्यातली माय,
झाली आभाळाएवढी.
कणमात्र मी तसाच,
मन कौतुके नाचते.

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

अनुपम

जीव गोजिरा गोंडस,
हळू गोडगोड हसे.
तुझ्यामाझ्या संसारात,
निरागस स्वप्न दिसे.

बाळलीला काय म्हणू,
किती वेड लावी जीवा.
देवबाप्पाचा हा ठेवा,
कायमचा मनी हवा.

लटकेच जणू रडे,
तहानभूक लागता.
बोबडाच जीव बोले,
समजूत ही घालता.

रोजचाच दिस नवा,
रोज गोड स्वप्न पडे.
तुझ्यामाझ्या काळजाचे,
नाव 'अनुपम' गडे!

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

शब्दगंधाची ओळख

खुडबुडले मनात,
शब्द झिंगले क्षणात.
किती दिसांनी उगवे,
काव्यऊर्मीची कनात.

अवचित काही हले,
मन मनाशीच बोले.
झाला कैसा विसंवाद,
शब्द पेटले मनात.

शब्द गुंफती शब्दांत,
काव्यहार ओंजळीत.
ओळखीचा वाटे गंध,
शब्दफुलांचा हातात.

कधी वाटे पारिजात,
मोगऱ्याची बरसात,
शब्दगंधाची ओळख,
वसे खोल या मनात.

बुधवार, ३० जून, २०२१

जन्मणारा बाप

माझा डोळीचा पाळणा,
बाळा तुझ्यासाठी झुले.
सदोदित वर्षावात,
संसारात प्रेम फुले.

किती गोजीरा गोंडस,
जीव इतकुला तुझा.
भोवताली तुझ्या बाळा,
जीव पिंगा घाले माझा.

ऐसे नाजूक हासणे,
वेड लावते जीवाला.
दृष्ट कोणाची न लागे,
माझ्या इवल्या बाळाला.

जोजवता तुज हाती,
झुला जीव माझा घेतो.
क्षणोक्षणी रे सोबत,
बाप जन्मत राहतो.

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...