बुधवार, ३० मार्च, २०२२

कवडसे

पापणी हळू मिटता,
झोपे अलगद कसे.
माझ्या बाळाचा चेहरा,
रूप देवाजीचे दिसे.

पडे निपचित वेडे,
भान असे हरपून.
उचंबळून येतसे,
माया मनात दाटून.

वाटे घ्यावे पटापटा,
मुके गालाचे अनेक.
माझे काळीज झोपले,
गुंतवूनी जीवा एक.

जसा मोठा होई जीव,
गलबलून येतसे.
राहो निरागस सदा,
माझे छोटे कवडसे.

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

बोळकं

बोळकं हासते गोड,
गोबऱ्या गाला सोबत.
किती प्रसन्न वाटते,
बाळ हासता गंमत.

कसे रांगते जोरात,
अशा दुडक्या चालीत.
धडपडे गडबडे,
अडकता खेळण्यात.

कधी भोकाड पसरे,
भंबेरी उडे घरात.
काऊचिऊच्या नादात,
दुःख विसरे क्षणात.

माझा गोंडळ गोंडुळा,
किती बाळलीला छान.
क्षण किती येती जाती,
होई जीव रममाण.

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

बाप पाठीशी नसता

बाप पाठीशी नसता,
होई आभाळ पारखे.
सदा वैशाखवणवा,
मन उदास सारखे.

अशा जगण्याची धग,
होरपळून टाकते.
कोण स्नेही जवळचा,
जग सापत्न वागते.

हेवेदावे रुपी भाले,
रक्तबंबाळ करती.
नाते झिडकारण्याला,
शर्थ प्राणाची लावती.

पुरे पुण्याई बापाची,
शेवटच्या क्षणालाही.
जगी नसला तरीही,
बाप सदा मनी राही.

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

लेक माझा दोस्त

चल गड्या,सवंगड्या
आता दोस्ती ही करू.
बाप लेकाच्या पल्याड,
नवे जग हे साकारू.

आळीमिळी गुपचिळी,
खोड आईची काढता.
देऊ टाळी जोरदार,
जरा गमजा करता.

कधी गुपित सांगूया,
एकमेकांना विशेष.
गळाभेटीने वाटूया,
आसू डोळ्यातले खास.

कधी हातावर झुला,
कधी पाठीवर खेळ.
नाते जुने, नवे जिणे,
जुळे आनंदाचा मेळ.

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

बाळ झोपला

बाळ झोपला,
गाढ झोळीत.
मऊ उबेत,
चर्या हसे.

हात हाताशी,
गुंफे हळूच.
मोठा आळस,
छान दिसे.

मोडतो अंग,
मनापासूनी.
लाळ हाताने,
जरा पुसे.

स्वप्न बघे का,
देवाजीचे हा?
प्रश्न माझिया,
मनी वसे.

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

बापाविण सण

अवसान दिवाळीचे,
वाटे उसणे पासणे.
जाई काळजा चिरत,
जगी बापाचे नसणे.

लाडू तोंडा लागे कडू,
चकली वाटे बेचव.
नसे बाप फराळाला,
येई क्षणाला आठव.

वाटे ज्योत पणतीची,
तेजहीन व सुतकी.
ओढ वाटे बापासाठी,
तडफड ही चातकी.

कसे करावे सोहळे,
काय मजा सणातली.
बापाविण पोरका मी,
रुखरुख मनातली.

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

बाळ घरात येणार

होई आकाश ठेंगणे,
मनमोर नाचणार.
माझा कलेजा तुकडा,
बाळ घरात येणार.

किती आस लागलेली,
किती वाट बघणार.
माझ्या मनाचा फुलोरा,
बाळ घरात येणार.

माझी पापणी थकली,
किती पाणी थांबणार.
आसवे ही आनंदली,
बाळ घरात येणार.

कधी होईल मी घोडा,
कधी हात धरणार.
बागडण्या आता पिल्लू,
बाळ घरात येणार.

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...