बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

प्रेमाचे साकडे

चल सये जाऊया, प्रेमाच्या गावा.
संसार व्यापाच्या पलीकडे, वेळ द्यायला हवा.
हातात हात घेऊन बसू, गप्पा गोष्टी करत.
धावपळ दगदग असणारच, पाठोपाठ परत.

पिऊ एखादे शहाळे, दोन स्ट्रॉ टाकून.
काटकसर नाही ग, घेऊ प्रेम वाटून.
पाणीपुरी खाऊ आज, तुला आवडते तशी.
चिंच पाणी थोडे फार, पेरू शेव जराशी.

पिक्चर टाकू कुठलाही, टिपिकल धाटणीतला.
उगाच हसू पाणचट, विनोदी नटाला.
हिरॉईनच्या डोळ्यात येता थोडे पाणी.
असाच टाकू उसासा, ऐकत तिची विराणी.

संत व्हॅलेंटाईनबाबाचा, करू थोडा जागर.
अध्यात्माच्या पलीकडे, शोधला प्रेमाचा सागर.
प्रेम दिनी त्या बाबाला, साकडे घालतो सये.
तुझ्या माझ्या प्रेमाला, नजर लागू नये.

बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

बाप आसवांना पितो

लेक सुकून पडता,
जीव जीवातून जातो.
आजारी पाडसासाठी,
बाप कासावीस होतो.

कसे बागडत होते,
पिल्लू घरभर माझे.
आता निपचित होता,
उंबरा भकास होतो.

चैतन्य चहू बाजूंनी,
जसे ओघवत होते.
मलूल होता पाखरू,
प्राण कंठापाशी येतो.

वाटे निरस उदास,
सारी प्रहरे दिसाची.
लेकाकडे पाहताना,
बाप आसवांना पितो.

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

वादळवारा

काचा साचल्या साचल्या,
सये माझ्या काळजात.
रक्त बंबाळ हे मन,
अवघ्या ह्या पसाऱ्यात.

सुटले जणू हे धागे,
जीवनाच्या भोवतीचे.
बेभान धावे बेबंद,
नियतीच्या ह्या फेऱ्यात.

भाकरीची तजवीज,
पाचवीस पुजलेली.
हातास तोंडाची गाठ,
निसटे ह्या विवरात.

निरस झाले सोहळे,
उसने हे अवसान.
मन कोमेजून गेले,
ऐशा वादळवाऱ्यात.

शनिवार, १ एप्रिल, २०२३

घालमेल

माझ्या इवल्या दोस्ताची,
मज आठवण येते.
जशी गाडी प्रवासाची,
ऐसी दूरदूर जाते.

असा येशी लडिवाळ,
माझ्या जवळ तू हळू.
गोंजरून घेशी तुला,
डोके मांडीवर घोळू.

गोल गोल मज गड्या,
प्रदक्षिणा तू घालशी.
अलगद मधूनच,
हात गळ्याशी गुंफशी.

बाबा गावाला जाताना,
आता रुसशील का रे?
स्पर्श मायेच्या हाताचा,
आता मागशील का रे?

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

ओढाताण

मनःशांतीचा पदर,
कसा फाटला फाटला.
जगण्याच्या हुंदक्यात,
जीव आटला आटला.

रोजचीच उठाठेव,
त्रागा साठला साठला.
धाप जोराची लागून,
ऊर फाटला फाटला.

आटापिटा कशासाठी,
पेच वाटला वाटला.
गोंधळलो माझा मीच,
प्रश्न दाटला दाटला.

दडपला माझा जीव,
श्वास तुटला तुटला.
ओढाताण सदोदित,
काळ मातला मातला.

गुरुवार, १४ जुलै, २०२२

पाठीराखा

वाट खाचखळग्यांची,
होई उन्हाने ही लाही.
होता जीव हा घाबरा,
आधार तुमचा होई.

होता दुःखाचा आघात,
वार अंगावरी घेई.
छत्रछाया आभाळाची,
माथ्यावर सदा रही.

कर्तृत्वाचा वटवृक्ष,
उंच आभाळात जाई.
दाट छायेत तयाच्या,
जीव सुखावला जाई.

कुणासाठीही कधीही,
पाठीराखा उभा राही.
जीवा संतोष लाभता,
जिणे उपकृत होई.

सोमवार, २० जून, २०२२

पहिला वाढदिवस

माझ्या आनंदाचा ठेवा,
आज वर्षाचा होई.
लगबग सोहळ्याची,
आनंदा उधाण येई.

जन्मा आले होते पिलू,
पितृदिनाच्या दिवशी.
नवचैतन्य लाभले,
भरते आले मनाशी.

घर नाचले डोलले,
बोबड्या जीवाभोवती.
बोळक्यातले सुहास्य,
देई सुखाची पावती.

माझ्या सुखाचे संचित,
तुझ्या भोवती साठले.
आशीर्वाद तुज देता,
पाणी डोळ्यात दाटले.

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...